WhatsApp

अकोला जिल्ह्यात सहा नगरांच्या निवडणुकीत विकासाचा मुद्दा केंद्रस्थानी | नवे चेहरे विरुद्ध जुना अनुभवी गट कोण ठरणार निर्णायक?

Share

अकोला न्यूज नेटवर्क ब्युरो दिनांक २५ नोव्हेंबर २०२५अकोला जिल्ह्यातील अकोट, तेल्हारा, बाळापूर, मूर्तिजापूर, आणि हिवरखेड नगरपरिषद बार्शीटाकळी नगरपंचायत निवडणुकांनी आता तापायला सुरुवात केली आहे. प्रचारासाठी फारसा वेळ नसताना, प्रत्येक पक्ष मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी धावपळ करत आहे. या निवडणुकीत एक गोष्ट स्पष्ट जाणवते… विकास हा मुद्दा आता फक्त भाषणापुरता राहिलेला नाही, तर तो मतदारांच्या निर्णयाचा केंद्रबिंदू बनला आहे.



शहरांचे प्रश्न वर्षानुवर्षे तसेच राहिले आहेत. रस्ते, पाणीपुरवठा, सांडपाणी व्यवस्था, आरोग्य, कचरा व्यवस्थापन, प्रकाशयोजना… याची यादी लांब आहे. मोठे आश्वासन देणारे अनेक आले आणि गेले, पण नागरिकांच्या हातात फारसे काही पडले नाही. या सर्व पार्श्वभूमीवर यंदाच्या निवडणुकीकडे मतदार नव्या दृष्टीकोनातून पाहत आहेत.

जिल्ह्यातील सहाही नगरांमध्ये एकाच भावना दिसत आहे. “विकास हवा, पण स्वच्छ आणि निश्चयी नेतृत्व असलेल्यांकडूनच.” अशा उमेदवारांची मागणी यंदा मोठ्या प्रमाणावर आहे. विशेष म्हणजे, मतदार मंडळी आता जुन्या तडजोडी मान्य करत नाहीत. राजकीय परंपरा किंवा पक्षनिष्ठेपेक्षा उमेदवाराची प्रतिमा, त्याची काम करण्याची वृत्ती आणि शहरासाठीची दूरदृष्टी यावर त्यांची नजर आहे.

विकास खुंटल्याचा नागरिकांचा स्पष्ट आरोप
गत अनेक वर्षांपासून नगरपंचायत क्षेत्रात कामांची गती अत्यंत मंद झाली. कुठे प्रकल्प अर्धवट, कुठे योजनेचे पैसे परत गेले, तर कुठे भ्रष्टाचाराचे सावट. अनेक शहरांमध्ये पायाभूत सुविधा कोसळण्याच्या स्थितीत आहेत. एकीकडे राज्य आणि केंद्राकडून कोट्यवधींचे प्रकल्प येत आहेत, तर दुसरीकडे त्यांची अंमलबजावणी करताना स्थानिक पातळीवरच गाडा अडकतो.

Watch Ad

याचा थेट परिणाम नागरिकांच्या दैनंदिन जगण्यावर होतो. विशेषत: अकोट, तेल्हारा आणि मूर्तिजापूरमध्ये रस्त्यांची अवस्था खड्डेमय आहे. बार्शीटाकळी, बाळापूर आणि हिवरखेडमध्ये पाणीपुरवठा आणि कचरा व्यवस्थापन हे कायमचे डोकेदुखीचे विषय. विकासाचा गाजावाजा निवडणुकीच्या काळात मोठा असला तरी प्रत्यक्ष काम मात्र कमीच, हा राग आणि नाराजी मतदार स्पष्टपणे व्यक्त करत आहेत.

सर्वच पक्षांकडून ‘विकास’ कार्डावर खेळ
भाजप युती असो वा काँग्रेस आघाडी… सर्वच पक्ष आपल्या प्रचारात विकास हाच मुख्य मुद्दा ठेवत आहेत. शहरातील विविध समस्यांवर ठोस उपाययोजना देण्याची स्पर्धा सुरू आहे. काही ठिकाणी पक्षांतील अंतर्गत मतभेद कमी करण्याचा प्रयत्न दिसतोय, तर काही नगरांमध्ये नव्या चेहऱ्यांना प्राधान्य दिल्यामुळे जनतेत सकारात्मक प्रतिक्रिया निर्माण झाली आहे.

यंदाची निवडणूक फक्त राजकीय समीकरणांवर अवलंबून राहणार नाही, असे जाणवते. कारण नागरिकांचे लक्ष आता घोषणांपेक्षा कामगिरीकडे आहे. मागील पाच वर्षांत कोणाने काय केले, कोणते प्रकल्प पुढे नेले किंवा अडवले… हेही मतदार तपासत आहेत.

नवे, स्वच्छ प्रतिमेचे उमेदवार केंद्रस्थानी
यंदा बहुतेक नगरांमध्ये तरुण उमेदवारांची संख्या वाढली आहे. त्यांच्याकडून अपेक्षाही तशाच आहेत. तरुणाईने दिलेले आश्वासन की ते शहराला नवा वेग आणि नवी दिशा देतील, हे मतदारांना भावते आहे. स्वच्छ प्रतिमेच्या उमेदवारांची मागणी खूप वाढली आहे. यामुळे अनेक जण पक्षनिष्ठेपेक्षा व्यक्तिमत्त्वाला महत्त्व देत आहेत.

जुन्या राजकारण्यांना यामुळे धक्का बसला असला तरी तेही आता प्रचारात अधिक आक्रमक आणि सक्रिय झाले आहेत. जनतेला पटवून देण्यासाठी विविध सभांमध्ये, घर-घर भेटीत आणि सोशल मीडियातून प्रयत्न सुरू आहेत.

विकासावरच रंगणार निवडणूक: जाणकारांचा अंदाज
राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे की यंदाची निवडणूक ही मुद्दाम मुद्द्यावर लढवली जाईल. कारण मतदारांनी आता फक्त घोषणेवर विश्वास ठेवायचे बंद केले आहे. ते नवे प्रश्न मांडणारे, तंत्रज्ञानाचा वापर करणारे आणि प्रत्यक्ष कामात उतरू शकणारे नेतृत्व शोधत आहेत.

याच कारणाने नगरपरिषद निवडणुकांमध्ये राज्य किंवा राष्ट्रीय राजकारणाचे परिणाम अत्यल्प दिसतील. स्थानिक प्रश्न, स्थानिक नेतृत्वाची क्षमता आणि भविष्यातील विकासाचा खाका… यावरच निकाल ठरणार आहे.

सहा नगरांच्या हरण्या-जिंकण्यापेक्षा महत्वाची गोष्ट लोकांच्या अपेक्षा
या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेत सर्वात उल्लेखनीय गोष्ट म्हणजे मतदारांचा बदललेला दृष्टिकोन. त्यांना आता विकास हवा आहे, पण तो तडजोडीचा किंवा अपूर्ण नको. ते स्थिर, पारदर्शक आणि खात्रीशीर काम करणारे प्रतिनिधी शोधत आहेत.

अर्थातच, अकोट ते हिवरखेडपर्यंतचे राजकारण आता तापणार आहे. कोणता पक्ष बाजी मारतो, कोणते नवे चेहरे पुढे येतात आणि पुढील पाच वर्षे या नगरांचा विकासमार्ग कोणत्या दिशेने वळतो… हे पाहणे रंजक ठरेल.

Leave a Comment

error: Content is protected !!