WhatsApp

Akola अकोला–अकोट ब्रॉडगेजच्या तिसऱ्या वर्धापनदिनाचे वास्तव | तीन वर्षांत फक्त तीन गाड्या, सुविधा अद्याप अपुऱ्या

Share

अकोला न्यूज नेटवर्क ब्युरो प्रतिनिधी अकोला, २३ नोव्हेंबर: अकोला ते अकोट हा बहुप्रतिक्षित ब्रॉडगेज रेल्वे मार्ग उद्या तीन वर्षांचा टप्पा पूर्ण करतो आहे. २३ नोव्हेंबर २०२२ रोजी झालेल्या लोकार्पणानंतरही या मार्गाचा विकास ठप्प आहे. संपूर्ण पाच राज्यांना जोडणारी कनेक्टिव्हिटी उपलब्ध असल्याचे सांगितले गेले, परंतु तीन वर्षांत फक्त तीन गाड्या धावतात, तर प्रवासी सुविधा तशाच राहिल्या आहेत.



अकोट परिसरातील नागरिक सांगतात की जुलै २०२० पासून मार्गाची चाचणी पूर्ण असूनही रेल्वे सुरू करण्यास विलंब होत राहिला. परिस्थिती बदलली ती गांधीग्राम पुलाला तडे गेल्यानंतर. ऑक्टोबर २०२२ मध्ये पुल वाहतुकीसाठी बंद झाल्यावर अचानक कार्यवाही वेगात आली आणि स्टेशनला सुरु करण्याचा निर्णय घेतला गेला. मात्र त्यानंतर या मार्गाकडे कोणतेही लक्ष दिले गेले नाही, अशी भावना लोकांमध्ये आहे.

प्रवाशांच्या वाढत्या मागण्या अजूनही प्रलंबित

मार्गाचा पूर्ण क्षमतेने वापर व्हावा आणि प्रवास सुलभ व्हावा यासाठी स्थानिक प्रवाशांकडून खालील मागण्या सातत्याने मांडल्या जात आहेत:

  • डीईएमयू कनेक्टिव्हिटी: नागपूर व मुंबईकडे जाणाऱ्या प्रमुख गाड्यांच्या वेळांशी जुळणारी डेमू सेवा सुरू करावी.
  • आरक्षण काउंटर: अकोट स्थानकावर तिकीट आरक्षण सुविधा सुरू करावी.
  • फेऱ्यांमध्ये वाढ: सध्या धावणाऱ्या गाड्यांव्यतिरिक्त किमान दोन फेऱ्या वाढवाव्यात.
  • लोको रिव्हर्सल: अकोट येथे इंजिन रिव्हर्सलची सुविधा उपलब्ध करावी.
  • सुविधा आणि स्टाफ: स्थानकावर प्रकाश व्यवस्था आणि आवश्यक कर्मचारी उपलब्ध करावेत.

खंडवा रेल्वे मार्ग पूर्ण होईपर्यंत हा ब्रॉडगेज मार्ग प्रवाशांसाठी महत्त्वाचा पर्याय ठरू शकतो. मात्र त्यासाठी या सुविधा तातडीने उभारणे आवश्यक असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.

Watch Ad

Leave a Comment

error: Content is protected !!