WhatsApp

अकोट निवडणुकीत अचानक उलथापालथ… माघारीनंतर संपूर्ण चित्रच बदललं!

Share

अकोला न्यूज नेटवर्क ब्युरो अकोट, ता. २२: अकोट नगरपरिषद निवडणुकीत माघारीची अंतिम मुदत संपल्यानंतर निवडणुकीचे चित्र अधिक स्पष्ट झाले आहे. नगराध्यक्ष पदाकरिता दोन उमेदवारांनी आणि सदस्य पदासाठी तब्बल १६ उमेदवारांनी त्यांचे अर्ज मागे घेतले. या घडामोडीनंतर अकोटमधील राजकीय वातावरण अधिक तापले असून, खासकरून नगराध्यक्ष पदाच्या लढतीत आता आठ उमेदवार शिल्लक राहिल्याने बहुरंगी संघर्ष टळणार नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे.



उमेदवारी माघारीने बदलले समीकरण

२१ नोव्हेंबर हा उमेदवारी माघारीचा अंतिम दिवस होता. त्यानुसार शुक्रवारी उमेदवारांनी माघार घेण्यास सुरवात केली. नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी एकूण १० अर्जांपैकी सिंधु नाजुकराव पुंडकर आणि शेख नगमा अंजूम मोहम्मद अजहर यांनी अखेरच्या क्षणी बाजूला होण्याचा निर्णय घेतला. या दोन उमेदवारांच्या माघारीनंतर अध्यक्षपदाची थेट लढत आठ जणांत होणार असल्याचे स्पष्ट झाले.

छाननी प्रक्रियेनंतर नगराध्यक्ष पदासाठी १४ अर्ज आणि सदस्य पदासाठी २२८ उमेदवारी अर्ज पात्र ठरले होते. एवढ्या मोठ्या संख्येने पात्र अर्ज मिळाल्यामुळे प्रमुख राजकीय पक्षांचे स्थानिक नेते आणि प्रबळ उमेदवार चक्रावले होते. अनेक हौशी उमेदवार, नाराज गटांचे चेहरे आणि स्थानिक समीकरणांमुळे निर्माण झालेल्या गुंतागुंतीकडे पाहता, मतविभागणीचा धोका वाढणार होता.

पडद्याआड मोठे राजकारण

माघारीची मुदत जवळ येत असताना, स्थानिक नेतेमंडळी आणि महत्त्वाच्या उमेदवारांनी पडद्याआड हालचाली वाढवल्या. काही उमेदवार फक्त नाराजी किंवा गवशा म्हणून मैदानात उतरले होते. त्यांच्यामुळे मतविभागणी होऊन मुख्य उमेदवारांचे नुकसान होण्याची शक्यता होती. त्यामुळे त्यांना रिंगणाबाहेर करण्यासाठी चर्चा, समजूत आणि स्थानिक पातळीवर मोठे राजकारण झाले.

Watch Ad

शुक्रवारी दुपारी ३ वाजेपर्यंत कोण माघार घेणार आणि कोण अखेरच्या क्षणापर्यंत लढणार, याबाबतची उत्सुकता कायम होती. मुदत संपताच वास्तविक चित्र स्पष्ट झाले. नगराध्यक्ष पदासह सदस्य पदाच्या लढतीतही माघारीमुळे काही प्रभागांत सरळ-सोपे तर काही ठिकाणी कडवे संघर्ष दिसू शकतात.

सदस्य पदासाठी १६ उमेदवारांची माघार

सदस्य पदाच्या लढतीत खालील उमेदवारांनी माघारी घेतल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी पत्रकाद्वारे जाहीर केली:

वर्षा दिडोकार (१४ अ), शरिफोद्दीन अलीमोद्दीन (३ ब), अब्दुल रजिक अब्दुल रहेमान (३ ब), शहा मैमुनाबि हसन शहा (२ अ), अफजल खा अमरुउल्लाह खान (७ अ), रेश्मा खातून नजर उल्लाह खान (९ ब), जमील खान आसिफ खान (१३ ब), रेहाना नसरीन मोहम्मद इकबाल (१३ अ), नसीमा हार्दीक खा (१ ब), रुखसाना परविन अब्दुल जमीर (९ ब), सिंधु नाजुकराव पुंडकर (१७ ब), सैय्यद शारिक अली सैय्यद यावर अली (१५ ब), रजिया बी अब्दुल सत्तार (१ अ), सय्यदा सायमा अंजुम सय्यद बशीर (२ ब), उमेश विलासराव टेम्भरे (१५ ब), मृणाल किशोर तेलगोटे (१६ अ).

या माघारीनंतर अनेक प्रभागांत लढतीचा जोर बदलला आहे. काही ठिकाणी सरळ लढत तर काही ठिकाणी त्रिकोणी आणि चौकोनी संघर्ष दिसू शकतो.

पुढे काय?

सध्या नगराध्यक्ष पदासाठी आठ जण मैदानात आहेत. सर्व पक्षांनी ताकदीनिशी प्रचार सुरू केला आहे. बहुरंगी लढतीमुळे अंतिम निकाल कोणाच्या बाजूने झुकणार, हे सांगणे कठीण आहे. स्थानिक मुद्दे, पक्षांतर्गत नाराजी, जातीय आणि सामाजिक समीकरणे या निवडणुकीत महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत.

अकोट नगरपरिषद निवडणूक यावेळी अधिक रंगतदार आणि चुरशीची होण्याची चिन्हे आहेत. आठ उमेदवारांच्या या संघर्षात कोण बाजी मारते, हे २१ नोव्हेंबरनंतरच्या घडामोडींनी नक्कीच ठरणार आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!