WhatsApp

अकोट नगर परिषद निवडणूक रंगली

Share

आघाडी–युतीचे घटक पक्ष वेगळ्या वाटेवर; उमेदवारांची तोबा गर्दी, मतदानात अनिश्चितता वाढली

अकोला न्यूज नेटवर्क ब्युरो दिनांक १९ नोव्हेंबर २०२५:अकोट नगर परिषद निवडणुकीत यंदा राजकीय समीकरणे पूर्णपणे ढासळलेली दिसत आहेत. आघाडी आणि युतीतील घटक पक्षांनी स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतल्यामुळे मैदानात उमेदवारांची संख्या झपाट्याने वाढली आहे. मतदारांना मात्र यामुळे मोठी चंगळ मिळणार आहे.



राज्यात सत्तेवर असलेल्या महायुतीतील भाजप, शिंदे गटाची शिवसेना आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) या तिन्ही पक्षांनी नगराध्यक्ष पदासाठी वेगवेगळे उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. भाजपकडून माया धुळे, शिंदे सेनेतर्फे चंचल पितांबरवाले तर अजितदादा पवारांच्या राष्ट्रवादीकडून गजिया बांनो मो. बदरूज्जमा या तिन्ही जणींची थेट भिडंत रंगणार आहे.

याला प्रतिसाद म्हणून आघाडीतील काँग्रेसने अलका बोडखे आणि उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेने विजया चौधरी यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे मुख्य लढत पंचकोनी स्वरूप धारण करत असून संपूर्ण निवडणुकीत रंगत वाढली आहे.

याचबरोबर वंचित बहुजन आघाडीच्या स्वाती चिखले यांनीही जोरदार तयारी केली आहे. विशेष म्हणजे प्रभाग क्रमांक १७ मध्ये दोन जिवलग मित्र एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आहेत. दोघांनी वेगवेगळ्या पक्षाचे तिकीट घेतले असले तरी उमेदवारी भरताना ते सोबत असल्याचे चित्र दिसले. पक्षभेद असले तरी मैत्री कायम असल्याने या प्रभागात मतदारांना अनोखी मैत्रीपूर्ण लढत पाहायला मिळणार आहे.

Watch Ad

नगराध्यक्षपदाचे स्वप्न पाहणाऱ्या अनेक मान्यवरांना पक्षश्रेष्ठींनी तिकीट नाकारल्याने काही जण नाराज आहेत. काहींना नगरसेवक पदाचेही तिकीट मिळाले नाही. त्यामुळे हे असंतुष्ट चेहरे आतून कुठे भडास काढतात याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.

सध्या कोण कोणाचा मित्र आणि कोण कोणाचा विरोधक हे समजून घेण्यासाठी प्रत्येक समीकरण बारकाईने पाहावे लागत आहे. २ तारखेपर्यंत चित्रात मोठा बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एकूणच निवडणूक अनिश्चिततेत असून प्रत्येक पक्षाने रिंगण बहुकोनी करण्याचा प्रयत्न केला आहे.

राज्यातील सत्ता आणि विरोधातील भागीदार एकमेकांविरोधात उभे ठाकल्याने अकोट नगर परिषद निवडणूक यंदा वेगळीच रंगत घेऊन आली आहे. मतदारांसाठी हा सामना अधिक रंजक होण्याची चिन्हे आहेत.

Leave a Comment

error: Content is protected !!