अकोला न्यूज नेटवर्क ब्युरो दिनांक ११ नोव्हेंबर २०२५ राहुल सोनाने प्रतिनिधी वाडेगाव :- अकोला जिल्ह्यातील नवेगाव ग्रामातील जिल्हा परिषद शाळेत अल्पवयीन विद्यार्थिनीवर शिक्षकाकडून विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. संतप्त ग्रामस्थांनी आरोपी शिक्षकाला चांगलाच चोप दिला, तर पोलिसांनी त्याला अटक केली आहे. ‘शिक्षक हा विद्यार्थ्यांचा मार्गदर्शक असावा, अत्याचारी नव्हे,’ असा संताप नागरिकांनी व्यक्त केला. या प्रकरणामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली असून, शिक्षण क्षेत्रातील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. वाचा संपूर्ण तपशील आणि नागरिकांची प्रतिक्रिया फक्त ANN Akola News Network वर.
“शाळेत विद्यार्थिनीवर शिक्षकाचा अत्याचार, ग्रामस्थांचा संताप उसळला
अकोला जिल्ह्यातील वाडेगावजवळील ग्राम नवेगाव येथे घडलेला अत्याचाराचा प्रकार जिल्ह्यात खळबळ उडवणारा ठरला आहे. चान्नी पोलिस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कार्यरत असलेल्या शिक्षकाने अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याचा आरोप उघडकीस आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी शिक्षकाचे नाव सुधाकर पांडे असे असून, त्याने शाळेत शिकणाऱ्या सुमारे ११ वर्षांच्या विद्यार्थिनीशी अनुचित वर्तन केल्याचे समोर आले आहे. हा प्रकार सुमारे सहा दिवसांपूर्वी घडला होता. विद्यार्थिनीने धैर्य दाखवत आपल्या आईला संपूर्ण घटना सांगितल्यावर, कुटुंबीयांनी संताप व्यक्त करत थेट चान्नी पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी तत्काळ गुन्हा नोंदवून आरोपी शिक्षकाला ताब्यात घेतले.
ग्रामस्थांचा संताप आरोपीला दिला चोप, व्हिडिओ व्हायरल
घटनेची माहिती गावकऱ्यांना मिळताच संपूर्ण नवेगाव गाव संतापाने पेटले. शिक्षक हा विद्यार्थ्यांचा मार्गदर्शक असावा, हा आदर्शच काळवंडवणारा प्रकार गावकऱ्यांनी सहन केला नाही. संतप्त नागरिकांनी आरोपी शिक्षक सुधाकर पांडे याला पकडून चांगलाच चोप दिला, याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

या घटनेनंतर गावात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली. आरोपीवर अपराध क्रमांक ३०३/२०२५ अंतर्गत कलम ७४ भारतीय न्याय संहिता व लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (POCSO Act) कलम ८, १०, १२ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास ठाणेदार रविंद्र लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विजय घुगे व सुधाकर करवते करीत आहेत.
शैक्षणिक क्षेत्रातील सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह
या घटनेमुळे शिक्षण क्षेत्रात अस्वस्थता निर्माण झाली आहे. पालक आणि नागरिकांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की,
“शिक्षक ही आदर्शाची भूमिका आहे; अशा विकृत प्रवृत्तीला कठोर शिक्षा झालीच पाहिजे.”
ग्रामस्थांनी शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी CCTV कॅमेरे, महिला शिक्षकांची नियुक्ती आणि नियमित तपासणीची मागणी केली आहे. शैक्षणिक संस्थांमध्ये घडणाऱ्या अशा घटनांमुळे विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यावरही परिणाम होत असल्याचे बालकल्याण तज्ज्ञांनी सांगितले.
*पोलीस आणि प्रशासनाची कारवाई“
चान्नी पोलिसांनी घटनेची दखल घेत आरोपीस ताब्यात घेतलं असून, न्यायालयीन कोठडीत ठेवून तपास सुरू आहे. या घटनेबाबत जिल्हा शिक्षण विभाग आणि महिला बालकल्याण विभाग यांनीही स्वतंत्र चौकशी सुरू केल्याची माहिती मिळाली आहे. स्थानिक नागरिकांनी अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी कठोर कारवाईची मागणी केली आहे.
समाजातील संवेदनशीलतेची परीक्षा
नवेगाव प्रकरणाने पुन्हा एकदा दाखवून दिलं की, बालकांवरील अत्याचार हा समाजातील संवेदनशीलतेचा प्रश्न आहे. शिक्षकासारख्या पदावरून असा प्रकार घडणे हे शिक्षण व्यवस्थेवरील विश्वासाला तडा देणारे आहे. आता समाजाची मागणी एकच अशा विकृत प्रवृत्तीला शिक्षा होईपर्यंत संघर्ष सुरूच राहिला पाहिजे.
या घटनेबद्दल तुमची प्रतिक्रिया काय आहे?
तुमच्या परिसरातील सामाजिक, शैक्षणिक आणि स्थानिक बातम्या आम्हाला पाठवा — WhatsApp: 7720990022
अशाच ताज्या अपडेट्ससाठी भेट द्या 👉 ANN Akola News Network




