अकोला न्यूज नेटवर्क ब्युरो प्रतिनिधी स्वप्नील सुरवाडे दिनांक ३१ ऑक्टोबर २०२५:पातूर शहरातील वाहतूक व्यवस्था अक्षरशः कोलमडली असून नागरिकांचा संयम आता सुटू लागला आहे. मुख्य रस्त्यांवर प्रवासी आणि मालवाहू वाहनचालकांच्या मनमानी पार्किंगमुळे दररोज तासन्तास चालणारी वाहतूक कोंडी आता शहरवासीयांच्या नशिबी आली आहे. शालेय विद्यार्थी, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना रस्ता ओलांडणेही जिकिरीचे झाले असून वाहतूक विभागाचे मात्र संपूर्ण मौन कायम आहे.

पातूर शहरातून अकोला, बाळापूर आणि ग्रामीण भागाकडे जाणाऱ्या प्रवासी गाड्या चालकांच्या मनाप्रमाणे मुख्य रस्त्यावरच थांबतात. प्रवाशी मिळेपर्यंत गाडी सुरू न करण्याची सवयच जणू या चालकांना लागली आहे. परिणामी मागे वाहनांची रांग लागते आणि संपूर्ण रस्ता जाम होतो. या गर्दीत पादचारी आणि विद्यार्थी जीव मुठीत धरून रस्ता पार करतात.
मालवाहू वाहनांची स्थितीही यापेक्षा वेगळी नाही. दुकानदारांकडे माल पोहोचवताना ही वाहने रस्त्याच्या मध्यभागीच उभी राहतात, त्यामुळे रस्ते अधिक अरुंद होतात. काही चालक माल उतरत असताना गाडी रस्त्यावरच सोडून जातात. अशा निष्काळजीपणामुळे अनेकदा अपघात होण्याची शक्यता वाढली आहे.

मार्केट परिसरात तर परिस्थिती अधिक बिकट आहे. दुकानदारांसमोर प्रवासी वाहने, दुचाकी आणि मालवाहू गाड्यांचे बेकायदेशीर पार्किंग रोजचेच झाले आहे. या सगळ्या गोंधळामुळे वाहतूक व्यवस्था पूर्णपणे ठप्प होते. स्थानिक नागरिकांनी या समस्येविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली असून, त्यांनी वाहतूक विभागाकडे कठोर कारवाईची मागणी केली आहे.
 
नागरिकांचे म्हणणे आहे की, “वाहतूक विभागाने नियम तोडणाऱ्यांवर दंड आकारून कठोर पावले उचलली नाहीत, तर येत्या दिवसांत ही समस्या आणखी गंभीर बनेल.” शहरात वाहतूक नियंत्रणासाठी अधिकाऱ्यांनी सातत्याने गस्त घालणे, ठराविक ठिकाणी पार्किंग झोन निश्चित करणे आणि नियम मोडणाऱ्यांवर तात्काळ दंडात्मक कारवाई करणे आवश्यक असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले.
पातूर शहरातील वाढत्या वाहनसंख्येसह नियंत्रणाचा अभाव हा नागरिकांसाठी मोठा डोकेदुखीचा विषय बनला आहे. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही, तर वाहतूक कोंडीसोबतच अपघातांची संख्याही वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
 
         
			 
         
         
        




