अकोला न्यूज नेटवर्क ब्युरो दिनांक ३१ ऑक्टोबर २०२५: आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, महापालिका आणि नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने उमेदवारांच्या निवडणूक खर्चाच्या मर्यादेत मोठी वाढ जाहीर केली आहे. वाढती महागाई, प्रचार साहित्याचे वाढलेले दर आणि इंधन दर लक्षात घेऊन आयोगाने ही मर्यादा वास्तव परिस्थितीनुसार सुधारली आहे.
अकोला महापालिकेच्या निवडणुकीत आता एका उमेदवाराला जास्तीत जास्त नऊ लाख रुपये खर्च करण्याची परवानगी असेल. तर अकोला जिल्हा परिषदेसाठी प्रत्येकी साडेसात लाख रुपये, आणि पंचायत समितीच्या उमेदवारांना सव्वापाच लाख रुपये खर्च करण्याची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. यापूर्वी ही मर्यादा साडेतीन लाख रुपयांपर्यंतच होती.
राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, मागील आठ-नऊ वर्षांपासून या खर्च मर्यादेत कोणताही बदल झाला नव्हता. परिणामी, प्रचार मोहिमेदरम्यान अनेक उमेदवार खर्च मर्यादा ओलांडत, तो विविध मार्गांनी ‘लपविण्याचा’ प्रयत्न करत असल्याची चर्चा नेहमीच रंगायची. आता आयोगाने वास्तव खर्च लक्षात घेऊन ती सुधारित केल्याने पारदर्शकता वाढण्याची अपेक्षा आहे.
आयोगाने याचबरोबर निवडणूक खर्चाच्या गणनेत वापरण्यात येणारे प्रमाणभूत दरही जाहीर केले आहेत — चहासाठी ८ ते १० रुपये, नाष्ट्यासाठी १५ ते २५ रुपये, आणि जेवणासाठी ५० ते ७० रुपये असे दर निश्चित करण्यात आले आहेत.
 
दरम्यान, आगामी १० ते १५ दिवसांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा पहिला टप्पा जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण आणखी तापणार असून, उमेदवारांनी आता ‘नव्या मर्यादेत’ राहून प्रचाराची आखणी सुरू केली आहे.
 
         
			 
         
         
        




