ANN न्यूज नेटवर्क, अकोला पातूर प्रतिनिधी – स्वप्निल सुरवाडे दि.१३ ऑक्टोबर २०२५ पातूर : गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या गुंडांनी एक युवकाचे अपहरण करून त्यास बेदम मारहाण करून जखमी केले असून यामध्ये कारवाई करण्याकरिता गेलेल्या पोलिसांवर देखील हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याची घटना पातूर शहरात घडली आहे.
घटनेची सविस्तर हकीकत अशी की आज दि.१३ ऑक्टोबर २०२५ रोजी पहाटे १:३० वाजताच्या सुमारास मुलाची तब्येत ठीक नसल्याने त्याच्याकरिता बिस्कीट आणण्यासाठी अक्षय भीमराव उमाळे व त्याचे जावई शंकर पाटील हे पातूर शहरातील जुन्या बस स्थानक चौकातील एका हॉटेलवर गेले असता शिवम उर्फ शिवा निलखन व त्याच्या साथीदारांना येऊन अक्षयच्या गाडीची चावी काढून त्याच्याशी वाद घालत मारहाण सुरू केली असता अक्षयचे जावई शंकर पाटील यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता त्यांना लोटून दिले व मध्ये येऊ नकोस असा दम देऊन अक्षय उमाळे यास नानासाहेब नगर जवळील हिंदू स्मशान भूमी समोर घेऊन गेले व काठ्या,लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करू लागल्याने शंकर पाटील यांनी पातूर पोलीस स्टेशनमध्ये धाव घेत घटनेची माहिती दिली असता पो.हे.कॉ. वासीमोद्दीन इस्माईलोद्दीन, पो.कॉ.ठाकरे, पो.कॉ.जाधव यांनी घटनास्थळी धाव घेऊन आरोपी शिवा निलखन,योगेश महादेव तायडे,आकाश गजानन राऊत यांच्या तावडीतून अक्षय उमाळे यास सोडवून आरोपींना पकडण्यासाठी पोलीस पुढे आले असता यातील आरोपी शिवम उर्फ शिवा निलखन याने पो.हे.कॉ.वासीमोद्दीन इस्माईलोद्दीन यांच्या अंगावर चवताळून धावून आला व त्यांच्या हातावर मारून जखमी केले व पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना इतर पोलीस साथीदारांनी मदत करून सर्व आरोपींना अटक केली.
सदर घटनेतील फिर्यादी अक्षय उमाळे याच्या तक्रारीवरून आरोपी शिवम उर्फ शिवा निलखन, योगेश महादेव तायडे,आकाश गजानन राऊत यांच्याविरोधात कलम ११८(१),११५(२),२५२,३५१(२)३,(५) भादंवि नुसार गुन्हा दाखल करण्यात आला तर पोलिसांवर हल्ला केल्याप्रकरणीची फिर्यादी पो.हे.कॉ.वासीमोद्दीन इस्माईलोद्दीन यांच्या तक्रारीवरून आरोपी शिवम उर्फ शिवा निलखन रा.शिर्ला ता.पातूर याचे विरोधात कलम १३२,१२१(१),३५२,११५(२)३५१(२) भादंवि नुसार गुन्हा दाखल केला असून आरोपी अटकेत असून सदर घटनेचा अधिक तपास पोउनि.रमेश खंडारे करीत आहेत.
सदर घटनेतील मुख्य आरोपी असलेला शिवा निलखन हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असून केवळ आपली दहशत पसरावी या उद्देशाने उठसुठ कोणाशीही जाणूनबुजून वाद घालून त्यास मारहाण केल्याच्या अनेक घटना याअगोदर त्याने केल्या असून जेमतेम काही महिन्यांपूर्वी एमपीडीए मधून एका वर्षासाठी तुरुंगात स्थानबद्धतेतून सुटून आला आहे.

तरी देखील त्याच्यात काहीच सुधारणा झाली नसून आता तर त्याची थेट पोलिसांवर हल्ला करण्यापर्यंत मजल वाढली.आजच्या घटनेत पहाटे पोलिसांनी शिवा निलखन याची जुने बस स्थानक ते पोलीस स्टेशन पर्यंत धिंड काढली,मात्र सकाळी – सकाळी हा प्रकार जनतेच्या फारसा निदर्शनास आला नाही.या गावगुंडाची दहशत संपविण्यासाठी पोलीस अधिक्षक अर्चित चांडक पॅटर्नप्रमाणे शहरातील गजबजलेल्या मुख्य मार्गावरून धिंड काढली पाहिजे अशा प्रतिक्रिया सामान्य नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहेत.गावगुंडांपासून पोलीसच सुरक्षित नसतील तर सामन्य जनतेचे काय असा सवाल देखील यावेळी उपस्थित होत असून जिल्हा पोलीस अधीक्षक चांडक साहेब यांनी स्वतः जातीने लक्ष घालून या गुंडाचा कायम बंदोबस्त करावा अशे मत पीडिताच्या कुटुंबातील व्यक्तीने आमच्याशी बोलताना व्यक्त केले.