अकोला न्यूज नेटवर्क ब्युरो दिनांक ६ ऑक्टोबर २०२५:-अवैध मांस विक्री विरोधात अकोला जिल्हा पोलीस दलाकडून “ऑपरेशन प्रहार” अंतर्गत प्रभावी कारवाई करण्यात आली. उरळ पोलीस स्टेशन हद्दीत ग्राम टाकळी निमकर्दा येथे गायीच्या जातीच्या जनावराचे मांस अवैधरित्या विक्री करणाऱ्या एका इसमास पोलिसांनी रंगेहात पकडले आहे.
दिनांक ५ ऑक्टोबर २०२५ रोजी उरळ पोलीस स्टेशनचे ठाणेदार पंकज कांबळे यांना गोपनीय माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तत्काळ पथक तयार केले. पंचांच्या उपस्थितीत ग्राम टाकळी निमकर्दा येथे छापा टाकण्यात आला. या कारवाईत मोहम्मद तौफिक अब्दुल सादीक (रा. बाळापूर) याला पोलिसांनी ताब्यात घेतले.त्याच्याकडून सुमारे ४० किलो गोमांस जप्त करण्यात आले असून, त्याची किंमत प्रति किलो २०० रुपये प्रमाणे एकूण ८००० रुपये एवढी आहे. तसेच त्याच्याकडील लोखंडी सुरी (किंमत ५० रुपये) देखील पंचासमक्ष जप्त करण्यात आली. एकूण ८०५० रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.
या प्रकरणात आरोपीविरुद्ध महाराष्ट्र पशू संरक्षण कायदा कलम ५,५(क), ९(अ) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन पडघन यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत ठाणेदार पंकज कांबळे, पीएसआय मुंडे, संतोष गाढवे, उमेश वाकोडे व पोलीस पथकाचा समावेश होता.या कारवाईनंतर परिसरात पोलीस प्रशासनाबद्दल समाधान व्यक्त होत असून, अवैध मांस विक्रीविरोधात पोलिसांचा “प्रहार” पुढेही सुरू राहणार असल्याचे संकेत मिळत आहेत.