अकोला न्यूज नेटवर्क
अकोला : दोन सर्पमित्रांनी ५८ दिवस परिश्रम घेऊन धामण सापाच्या १२ अंड्यांतून पिल्लांना जीवनदान दिले आहे. काळजीपूर्वक उबवलेली ही सर्व पिल्ले सुरक्षित नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आली असून, त्यांच्या प्रयत्नांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
अकोल्यातील सर्पमित्रांच्या प्रयत्नांना मोठे यश मिळाले आहे. खामगाव रोडवरील एका कार शोरूममध्ये पकडलेल्या धामण जातीच्या सापाने १२ अंडी दिली होती. ही अंडी सुरक्षित ठेवून योग्य काळजी घेतल्यामुळे अखेर सर्व अंड्यांतून पिल्ले बाहेर पडली. १२ जुलै रोजी कार शोरूममध्ये साप दिसल्याची माहिती मिळताच सर्पमित्र सुरज इंगळे यांनी तातडीने घटनास्थळी जाऊन साप पकडला. त्याला नैसर्गिक अधिवासात सोडताना त्यांनी पिशवीत ठेवलेली १२ अंडी आढळली. इंगळे आणि त्यांचे सहकारी अभय निंबाळकर यांनी ही अंडी घरी आणून योग्यरीत्या जपून ठेवली. अंड्यांची कृत्रिमरीत्या उबवणी करण्यासाठी लाकडी भुसा वापरून डब्यात मांडणी करण्यात आली. डब्याला श्वसनासाठी छिद्रे केली आणि सातत्याने उबदार तापमान राखण्यात आले. तब्बल ५८ दिवस या प्रक्रियेत घालविल्यानंतर सर्व अंड्यांतून पिल्ले सुखरूप बाहेर आली. ही सर्व पिल्ले बिनविषारी धामण जातीची असल्याने त्यांना सुरक्षितपणे नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले आहे. या यशामुळे सर्पमित्र सुरज इंगळे आणि अभय निंबाळकर यांनी समाधान व्यक्त केले असून, स्थानिक पर्यावरणप्रेमींनीही त्यांच्या कार्याचे कौतुक केले आहे. या प्रयत्नांमुळे केवळ सापाच्या पिलांना जीवनदान मिळाले नाही, तर पर्यावरण संरक्षणाच्या दिशेने एक प्रेरणादायी पाऊल उचलले गेले आहे.