अकोला न्यूज नेटवर्क
मुंबई : भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपावर तीव्र टीका केली आहे. मातोश्रीवर आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी मोदी सरकार आणि भाजपावर देशभक्तीच्या नावाखाली व्यापार केल्याचा आरोप केला. देशासाठी शहीद होणाऱ्या जवानांच्या बलिदानानंतर पाकिस्तानसोबत सामना खेळणे म्हणजे देशभक्तीची थट्टा असल्याचे उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केले.
उद्धव ठाकरे म्हणाले की, “ज्या पाकिस्तानसोबत आपण युद्ध पुकारलं होतं, त्याच पाकिस्तानसोबत आपण क्रिकेट मॅच खेळतोय. पहलगाम हल्ल्यानंतर देशभरात दु:खाचं वातावरण असताना भाजपाने उत्सव साजरा केला. देशभक्तीपेक्षा व्यापार मोठा वाटतो का? पाकिस्तानसोबत सामना खेळून पैसा कमवणं म्हणजे देशद्रोह नाही का?”
‘हर घर से सिंदूर’ अभियानाची घोषणा
पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंनी जाहीर केलं की, शिवसेनेच्या महिला आघाडीकडून ‘हर घर से सिंदूर’ अभियान राबवले जाईल. या मोहिमेत महिलांकडून सिंदूर जमा करून तो पंतप्रधान कार्यालयाला पाठवला जाईल. यामागचा उद्देश असा की, पहलगाम हल्ल्यात ज्या महिलांचे सौभाग्य उजाडले त्या बलिदानाची आठवण देशभर पोहोचवावी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकिस्तानसोबतचा सामना थांबवण्याचा ठोस निर्णय घ्यावा. “अजूनही वेळ गेली नाही. मोदींनी दमदारपणे सांगायला हवं की सामना होणार नाही,” असं ठाकरे म्हणाले.
भाजपावर ‘देशभक्तीच्या व्यापाराचा’ आरोप
उद्धव ठाकरेंनी भाजपाच्या दुहेरी भूमिकेवरही टीका केली. “बाळासाहेब ठाकरे यांनी जावेद मियादाँदला ठणकावून भारत-पाक मॅच होऊ देणार नाही असं सांगितलं होतं. पण आजचे नेते नवाज शरीफांच्या वाढदिवशी केक खायला जातात. मग आम्हाला देशभक्ती शिकवू नका. क्रिकेटमधून मिळणारे पैसे देशापेक्षा मोठे आहेत का?” असा सवाल ठाकरे यांनी उपस्थित केला.

त्यांनी जय शाह यांच्यावरही टीका केली. “उद्या जय शाह सामना पाहायला गेले तर त्यांना देशद्रोही ठरवणार का?” असा प्रश्न त्यांनी विचारला. तसेच, भाजपाच्या नेतृत्वावर विश्वास राहिलेला नसल्याचे ठाकरेंनी नमूद केले. “आम्ही कणखर पंतप्रधान मिळेल म्हणून पाठिंबा दिला होता. पण या सरकारकडून पाकव्याप्त काश्मीर परत मिळवला जाईल, यावर मला आता विश्वास नाही,” असेही ते म्हणाले. भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्याच्या निमित्ताने ठाकरे यांनी पुन्हा एकदा भाजपाविरोधात आक्रमक भूमिका घेतली असून, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही टीका महत्त्वाची मानली जात आहे.