अकोला न्यूज नेटवर्क
इम्फाळ : मणिपूरमधील वांशिक संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शुक्रवारी पहिल्यांदाच मणिपूर दौऱ्यावर दाखल झाले. या दौऱ्यात त्यांनी चुराचंदपूर, इम्फाळसह अनेक ठिकाणांना भेट देऊन परिस्थितीची माहिती घेतली. तसेच हिंसाचारग्रस्त आणि विस्थापित नागरिकांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. दौऱ्यातील एका कार्यक्रमात मोदींनी सर्व गटांना शांततेचं आवाहन करताना मणिपूरच्या लोकांसोबत केंद्र सरकार असल्याचा दिलासा दिला.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, “तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करण्यासाठी शांतता स्वीकारणं हा एकमेव मार्ग आहे. मणिपूर ही आशा आणि आकांक्षांची भूमी आहे. पण दुर्दैवाने येथे हिंसाचाराच्या घटना घडल्या. बाधित नागरिकांना भेटल्यानंतर मला विश्वास वाटतो की मणिपूरमध्ये आशा आणि विश्वासाची नवी पहाट उगवत आहे.” त्यांनी पुढे सांगितले की, “मी सर्व संघटनांना शांततेच्या मार्गाने पुढे जाण्याचं आवाहन करतो. केंद्र सरकार मणिपूरच्या लोकांसोबत आहे आणि जीवन पुन्हा रुळावर आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.”
शांततेचं आवाहन आणि विकासाचा मंत्र
मोदींनी भाषणात मणिपूरच्या नावातील ‘मणि’चा उल्लेख करत भविष्यात हा ‘मणि’ संपूर्ण ईशान्य भारताला उजळवेल असं सांगितलं. त्यांनी सर्व गटांनी हिंसा सोडून शांततेच्या मार्गावर यावं आणि भावी पिढ्यांच्या हितासाठी प्रगतीकडे वाटचाल करावी, असं आवाहन केलं. त्यांच्या हस्ते या दौऱ्यात अनेक विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणीही करण्यात आली.
७ हजार नवीन घरांचं आश्वासन
हिंसाचारात अनेक कुटुंबांनी आपली घरं गमावली आहेत. त्यांना दिलासा देताना पंतप्रधान मोदींनी ७ हजार नवीन घरं उभारण्यात केंद्र सरकार मदत करणार असल्याचं जाहीर केलं. विस्थापित कुटुंबांच्या पुनर्वसनाला गती देण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. मणिपूरमध्ये पुन्हा शांतता प्रस्थापित करून नागरिकांचं जीवन पूर्वपदावर आणण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध असल्याचं मोदींनी सांगितलं.

या दौऱ्यामुळे मणिपूरमध्ये शांततेचा आणि विकासाचा नवा संदेश गेला असून स्थानिक पातळीवर केंद्र सरकारकडून तातडीने दिला गेलेला दिलासा नागरिकांसाठी मोठा आधार ठरणार आहे.