अकोला न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मागील नऊ महिन्यांत सहा वेळा कुणालाही न सांगता गुप्त परदेश दौरे केले असल्याचा गंभीर आरोप केंद्रीय राखीव पोलिस दलाने (सीआरपीएफ) केला आहे. इटली, व्हिएतनाम, दुबई, कतार, लंडन आणि मलेशिया या देशांचा यात समावेश आहे. या संदर्भात सीआरपीएफच्या व्हीव्हीआयपी सुरक्षा विभाग प्रमुख सुनील जून यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना पत्र लिहून चिंता व्यक्त केली आहे. अशा कृतींमुळे व्हीव्हीआयपी सुरक्षेला धक्का बसतो आणि संभाव्य धोका वाढतो, असे या पत्रात नमूद केले आहे.
११३ वेळा सुरक्षा नियमांचा भंग
सीआरपीएफच्या नोंदीनुसार, राहुल गांधी यांनी २०२० पासून आतापर्यंत तब्बल ११३ वेळा सुरक्षा नियमांचे उल्लंघन केले आहे. यात भारत जोडो यात्रेतील दिल्ली दौऱ्याचाही उल्लेख आहे. ‘येलो बुक प्रोटोकॉल’नुसार, उच्चस्तरीय सुरक्षा असलेल्या व्यक्तींनी कोणत्याही प्रवासाची पूर्वकल्पना सुरक्षा यंत्रणेला द्यावी लागते. मात्र राहुल गांधींनी हे नियम वारंवार मोडल्याचे स्पष्ट झाले आहे.
झेड प्लस सुरक्षा असूनही शिथिलता
राहुल गांधींना सध्या अॅडव्हान्स सिक्युरिटी लाईजन कव्हरसह झेड प्लस श्रेणीची सुरक्षा उपलब्ध आहे. यात ५५ जवान, त्यात १० हून अधिक ‘एनएसजी’ कमांडो, सीआरपीएफचे जवान आणि स्थानिक पोलीस तैनात असतात. २०१९ पासून गांधी कुटुंबाकडे सीआरपीएफची सुरक्षा असून, त्याआधी जवळपास तीन दशके ‘एसपीजी’ सुरक्षा त्यांना उपलब्ध होती.