अकोला न्यूज नेटवर्क
अहिल्यानगर : भारतीय लष्कराच्या नगरमधील आर्म्ड कॉर्प्स सेंटर अँड स्कूल (एसीसी अँड एस) येथे आयोजित चर्चासत्रात ड्रोन तज्ज्ञांनी स्पष्ट केले की, सामूहिक ड्रोन वापरामुळे युद्धनीतीत मोठी क्रांती घडू शकते. ‘आराखडा, वर्चस्व व नष्ट करा : संभाव्य लष्करी क्रांती म्हणून सामूहिक ड्रोन युद्ध’ या विषयावर झालेले हे चर्चासत्र भारतीय लष्कराच्या रणनीतीला नवी दिशा देणारे ठरले.
ड्रोन युद्धाचा बदलता चेहरा
चर्चासत्रात आधुनिक युद्धातील ड्रोन तंत्रज्ञानाचा प्रभाव, त्याचे रणनीतीवरील परिणाम आणि भविष्यातील आव्हाने यावर भर देण्यात आला. स्वदेशी बनावटीच्या स्वार्म ड्रोनच्या मदतीने युद्धभूमीवर लक्ष्य साध्य करणे, टेहाळणी करणे आणि क्षेपणास्त्र प्रक्षेपण करणे अधिक परिणामकारक होत असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. या तंत्रज्ञानामुळे शत्रूवर आघाडी मिळवणे सोपे झाले असून युद्धाची पद्धतच बदलणार असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
नगरमध्ये स्वदेशी ड्रोनची चाचणी व वापर
नगरजवळील ‘के. के. रेंज’ येथे दोन वर्षांपूर्वी भारतीय लष्कराने स्वदेशी ड्रोनचा वापर सुरू केला होता. येथे ड्रोनच्या झुंडीने युद्धसरावाचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. पाकिस्तानविरुद्धच्या ‘ऑपरेशन सिंदूर’मध्येही ड्रोनचा वापर यशस्वीपणे करण्यात आला होता. नगरमधील यांत्रिकी पायदळ केंद्रास (एमआयआरसी) ड्रोनचे नोडल केंद्र म्हणून मान्यता मिळाली असून खाजगी क्षेत्रालाही ड्रोन उत्पादनासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. समारोप प्रसंगी कमांडंट मेजर जनरल विक्रम वर्मा यांनी स्वदेशी ड्रोन उद्योगाला चालना मिळाल्याचे सांगितले.





