WhatsApp

नेपाळमध्ये आंदोलने तीव्र, राऊतांचा भारताला सावध राहण्याचा इशारा

Share

अकोला न्यूज नेटवर्क
मुंबई :
भारताच्या शेजारील नेपाळमध्ये गेल्या काही दिवसांपासून हिंसक आंदोलन पेटले असून परिस्थिती गंभीर बनली आहे. आंदोलकांनी संसद, शासकीय इमारती तसेच माजी आणि विद्यमान पंतप्रधानांच्या घरांना लक्ष्य केले आहे. या गोंधळात पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी अखेर राजीनामा दिला. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे (ठाकरे) नेते संजय राऊत यांनी भारतालाही सावध राहण्याचा इशारा दिला आहे. त्यांनी एक्सवर एक व्हिडीओ शेअर करत पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण आणि भाजपाला टॅग करत भारतालाही अशी परिस्थिती उद्भवू शकते, असे म्हटले आहे.



नेपाळमध्ये हिंसक आंदोलनाची झळ
नेपाळमध्ये सोशल मीडियावर बंदी घातल्यानंतर आंदोलन तीव्र झाले आणि त्याने हिंसक रूप धारण केले. यात जवळपास २० तरुण आंदोलकांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. आंदोलकांनी संसद, शासकीय कार्यालये आणि माजी नेत्यांची घरे जाळल्याचे समजते. श्रीलंका आणि बांगलादेशप्रमाणेच सत्ताधाऱ्यांविरोधात तीव्र असंतोष नेपाळमध्येही उफाळून आला आहे. पाकिस्तानमध्ये देखील अशीच खदखद सामान्य जनतेमध्ये आहे, असे निरीक्षक सांगतात.

राऊतांची भारतावर टीका
संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना भारतातही परिस्थिती वेगळी नाही, असा दावा केला. “वरवर सगळे काही सुरळीत दिसते, पण लोकांमध्ये असंतोष आहे. त्यामुळे सरकारने खबरदारी घेणे गरजेचे आहे,” असे ते म्हणाले. शिवाय ‘सामना’च्या अग्रलेखातूनही राऊतांनी भारताच्या परराष्ट्र धोरणावर टीका केली. एकेकाळी नेपाळचे पंतप्रधान भारताला पहिली भेट देत, मात्र आता ते चीन आणि पाकिस्तान दौऱ्याला प्राधान्य देतात, हे भारताच्या परराष्ट्र धोरणाचे अपयश असल्याची टीका अग्रलेखातून करण्यात आली आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!