अकोला न्यूज नेटवर्क
मुंबई : मराठा आरक्षणाच्या आंदोलनानंतर आता मनोज जरांगे पाटील यांनी मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया १७ सप्टेंबरपूर्वी सुरू करण्याची मागणी केली आहे. मराठवाडा मुक्ती संग्रामदिनाच्या आत हैदराबाद गॅझेटियरच्या नोंदीनुसार ही कारवाई व्हावी, अन्यथा कठोर पाऊल उचलावे लागेल, असा इशारा त्यांनी दिला आहे.
समित्यांना कामाला लावण्याची सूचना
जरांगे यांनी सरकारला स्पष्टपणे सांगितले की गावागावातील तिघांची समिती तातडीने कामाला लावा आणि हैदराबाद स्टेटच्या क्षेत्रातील मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या. प्रक्रिया लांबवली गेल्यास लोकांमध्ये अविश्वास निर्माण होईल आणि त्यांना नाइलाजाने मोठा निर्णय घ्यावा लागेल, असे ते म्हणाले.
नेत्यांना इशारा आणि जनतेस संयमाचा सल्ला
सरकारला थेट इशारा देताना जरांगे म्हणाले की, वेळ आली तर राजकीय नेत्यांना आमच्या गावात आणि घरी येणे बंद करावे लागेल. दबावाखाली सरकारने चुकीचे निर्णय घेतले तर त्याचे दुष्परिणाम गंभीर होतील. मात्र मराठा समाजाला त्यांनी विजय आणि पराजय पचवण्याचा संयम ठेवण्याचा सल्ला दिला.
दसऱ्यापर्यंतची डेडलाईन
गॅझेटियरची तातडीने अंमलबजावणी केली नाही तर येत्या दसरा मेळाव्यात सरकारविरोधातील भूमिका स्पष्ट करावी लागेल, असा इशारा जरांगे यांनी पुन्हा दिला. त्यांनी सांगितले की, गरीबाच्या पोरांनी जीआर काढून दाखवला आहे, त्यामुळे मराठवाडा १०० टक्के आरक्षणात जाणार याची खात्री आहे.
