WhatsApp

Bike Price After New GST : स्प्लेंडर झाली स्वस्त, बुलेट मात्र महाग!

Share

अकोला न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : २२ सप्टेंबरपासून लागू होणाऱ्या नव्या जीएसटी प्रणालीमुळे दुचाकी बाजारात मोठा बदल होत आहे. ३५० सीसीपेक्षा कमी क्षमतेच्या बाइक्स आणि स्कूटर्स स्वस्त होणार आहेत. यापूर्वी २८% असलेला जीएसटी आता १८% करण्यात आला आहे. त्यामुळे हिरो स्प्लेंडर, होंडा शाइन, टीव्हीएस अपाचे, होंडा अ‍ॅक्टिव्हा, टीव्हीएस स्कूटी यांसारख्या लोकप्रिय गाड्या परवडणाऱ्या किमतीत मिळणार आहेत. उदाहरणार्थ, १ लाखाची बाईक आता ९० हजार रुपयांत मिळू शकते, तर स्कूटर्सच्या किमतीत सुमारे ८ हजार रुपयांची घट होईल.



बुलेटप्रेमींसाठी झटका
मोठ्या बाइक्स मात्र महागणार आहेत. ३५० सीसीपेक्षा जास्त क्षमतेच्या बाइक्सवर आता ४०% जीएसटी आकारला जाणार आहे. त्यामुळे रॉयल एनफील्ड हिमालयन आणि गुरिला सारख्या मॉडेल्स २५ हजार रुपयांनी तर इंटरसेप्टर, सुपर मिटिऑर, बीएसए गोल्ड स्टार सारख्या ६५० सीसी बाइक्स ४० हजार रुपयांनी महागतील. या करवाढीचा परिणाम रॉयल एनफील्ड, केटीएम, बजाज, ट्रायम्फ आणि हार्ले-डेव्हिडसनच्या अनेक मॉडेल्सवर होणार आहे. मात्र, रॉयल एनफील्ड क्लासिक ३५०, हंटर, बुलेट, मिटिऑर यांसारख्या मॉडेल्सवर ही वाढ लागू होणार नाही.

नव्या जीएसटीचा दुचाकी बाजारावर परिणाम
तज्ज्ञांच्या मते, नव्या करप्रणालीमुळे छोट्या बाइक्स स्वस्त झाल्या तरी मोठ्या बाइक्सच्या बाजारावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. रॉयल एनफील्डचे सिद्धार्थ लाल यांनी सर्व बाइक्सवर एकसमान १८% जीएसटी लागू करण्याची मागणी केली होती. क्लासिक लेजेंड्सचे अनुपम थरेजा यांनी छोट्या बाइक्सवरील करकपातीचे स्वागत केले, मात्र ६५० सीसी बीएसए गोल्ड स्टारसारख्या मॉडेल्सवर वाढलेल्या कराचा ताण बसणार असल्याचे त्यांनी नमूद केले. तज्ज्ञांच्या मते, शहरी व्यावसायिक आणि तरुण ग्राहक मोठ्या बाइक्सकडे वळत असल्याने या सेगमेंटचा वाढता वेग आता कमी होऊ शकतो.

Leave a Comment

error: Content is protected !!