अकोला न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्य सरकारने पंतप्रधान किसान सन्मान निधीच्या धर्तीवर सुरू केलेल्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सातवा हप्ता तीन दिवसांत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होणार आहे. एप्रिल ते जुलै २०२५ या कालावधीसाठी १९३२.७२ कोटी रुपयांच्या निधी वितरणाला मान्यता देण्यात आली असून, शासन निर्णय बुधवारी जाहीर झाला. २०२३-२४ च्या अर्थसंकल्पात नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची घोषणा करण्यात आली होती. पीएम किसान सन्मान निधीच्या धर्तीवर ही योजना राबवली जाते. यामध्ये राज्यातील पीएम किसान लाभार्थ्यांना अतिरिक्त मदत दिली जाते.
शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपणार
पीएम किसानचा २० वा हप्ता दोन ऑगस्ट रोजी राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाला. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये राज्य योजनेच्या सातव्या हप्त्याची उत्सुकता वाढली होती. आता पुढील तीन दिवसांत हा निधी थेट खात्यात जमा होणार असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.
९२.९१ लाख शेतकऱ्यांना थेट लाभ
राज्यातील एकूण ९३.०९ लाख शेतकरी या योजनेचे लाभार्थी आहेत. मात्र, पीएम किसानच्या लाभामध्ये एका कुटुंबातील दोन शेतकरी खातेदार आढळल्याने १८ हजार शेतकऱ्यांचा लाभ सध्या स्थगित ठेवण्यात आला आहे. पडताळणी झाल्यानंतर त्यांनाही निधी दिला जाणार आहे. त्यामुळे सध्या ९२.९१ लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर सातवा हप्ता जमा होणार आहे.
सरकारचा कटिबद्धतेचा पुनरुच्चार
कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी माहिती दिली की, शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी सरकार सदैव कटिबद्ध आहे. सातव्या हप्त्याच्या निधीमुळे शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
