अकोला न्यूज नेटवर्क ब्युरो दिनांक ३० ऑगस्ट २०२५ : अकोट-अकोला मुख्य मार्गावरील चोहोट्टा बाजार एमएससीबी ऑफिस रस्त्याचे बांधकाम सुरू असून, ठेकेदाराने रस्त्यावरच बांधकाम साहित्य टाकून ठेवले होते. दिवसा कदाचित ते दिसत असले तरी रात्रीच्या वेळी प्रकाशाचा योग्य तजवीज नसल्याने आणि कोणत्याही प्रकारचे चेतावणी फलक न लावल्याने हा ढिगारा वाहनधारकांसाठी सापळा ठरत होता. याच कारणामुळे काल संध्याकाळी घडलेल्या अपघातात एका निष्पाप तरुणाला जीव गमवावा लागला. असून या रस्त्यावर असंख्य नागरिकांना अपघातात या रस्त्यावर आपल्या प्राणास मुकावे लागले असल्याने या रस्त्यावर यमदूत तर फिरत नाही ना अशा चर्चा सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, अक्षय इंगळे (वय अंदाजे २५ वर्षे, रा. चोहोट्टा बाजार ) हा आपल्या मोटरसायकलवरून घरी, चोहोट्टा बाजाराकडे येत होता. दहीहंडा पोलिस स्टेशन हद्दितल एमएससीबी ऑफिसजवळ अचानक रस्त्यावर टाकलेल्या बांधकाम साहित्याचा मोठा ढिगारा त्याच्या नजरेत न आल्याने तो मोटरसायकलसह थेट त्या ढिगाऱ्यात घुसला. अपघात इतका भीषण होता की अक्षय जागीच गंभीर जखमी झाला. तत्काळ नागरिकांनी त्याला अकोला येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासणीदरम्यान त्याला मृत घोषित केले.
या घटनेने संपूर्ण अकोट शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. केवळ ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे एका तरुणाचा बळी गेला, ही बाब गंभीर मानली जात असून नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे. रस्त्यावर बांधकाम साहित्य टाकून ठेवणे हा वाहतूक नियमांचा भंग असून, नागरिकांच्या सुरक्षेशी खेळ करणारा गुन्हा आहे. तरीदेखील संबंधित ठेकेदाराविरुद्ध तत्काळ गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
ही दुर्घटना केवळ एका कुटुंबाचे भविष्य उद्ध्वस्त करून गेली नसून, प्रशासनाच्या जबाबदारीवरही प्रश्नचिन्ह निर्माण करून गेली आहे. मृत अक्षय इंगळे हा तरुण उत्साही व कष्टाळू होता. त्याच्या आकस्मिक निधनाने परिसरात शोककळा पसरली आहे.
