अकोला न्यूज नेटवर्क
पाटणा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आरजेडी आणि काँग्रेसच्या संयुक्त सभेमध्ये शिविगाळ आणि अपशब्द उच्चारल्याच्या मुद्द्यावरून बिहारमध्ये वातावरण चांगलंच तापलं आहे. शुक्रवारी भाजपाच्या कार्यकर्त्यांनी पाटणा येथे काँग्रेस कार्यालयाच्या बाहेर आंदोलन केलं. यावेळी भाजपा आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आमने सामने आले. तसेच दोघांमध्ये तुफान राडा झाला. भाजपाचे कार्यकर्ते आणि समर्थकांनी मोदींबाबत वापरण्यात आलेल्या अपशब्दांच्याविरोधात काँग्रेसच्या कार्यालयावर हल्लाबोल केला.
याबाबत माहिती देताना काँग्रेसच्या नेत्यांनी भाजपावर गंभीर आरोप केले आहेत. भाजपाचे कार्यकर्ते काँग्रेसच्या कार्यालयाचं गेट तोडून आत घुसले. तसेच त्यांनी लाठीमार केला. कार्यालयात उभ्या असलेल्या गाड्यांची तोडफोड केली. तसेच दगडविटांचा मारा केला. यामध्ये काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांना दुखापत झाली आहे. तसेच एका कार्यकर्त्याचं डोकं फुटलं असा आरोपही या नेत्याने केला.