अकोला न्यूज नेटवर्क
अकोला : जिल्यातील अवैध दारू व्यवसायावर अंकुश ठेवण्यासाठी अकोला पोलिसांनी “ऑपरेशन प्रहार” अंतर्गत मोठी कारवाई केली आहे. बार्शीटाकळी तालुक्यातील तिवसा बु गावात पोलिसांनी दोन ठिकाणी छापेमारी करून तब्बल ४८ हजार रुपयांहून अधिक किंमतीची अवैध दारू जप्त करून नष्ट केली. यामध्ये दोन ज्येष्ठ आरोपींवर दारूबंदी कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पहिल्या ठिकाणी मोठा साठा जप्त
२७ ऑगस्ट रोजी तिवसा बु गावातील पहिल्या कारवाईत पोलिसांनी ७४ वर्षीय लक्ष्मण काशीराम घासले यांच्या ठिकाणी छापा टाकला. येथे पोलिसांनी सडवा मोह आणि ५ लिटर देशी दारू जप्त केली. जप्त केलेल्या सामग्रीची किंमत जवळपास ३९ हजार २५० रुपये इतकी असल्याचे समोर आले. आरोपीवर दारूबंदी कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
दुसऱ्या ठिकाणी ४५ लिटर देशी दारू हस्तगत
दुसऱ्या कारवाईत पोलिसांनी ७३ वर्षीय धनसिंग अमरसिंह राठोड यांच्या ठिकाणी छापेमारी केली. येथे ४५ लिटर देशी दारू व मोठ्या प्रमाणात कच्चा माल पोलिसांनी ताब्यात घेतला. या सामग्रीची किंमत ४८ हजार २५० रुपये इतकी सांगितली जात आहे. कारवाईनंतर सामग्री तात्काळ नष्ट करण्यात आली.
या कारवाईचे मार्गदर्शन जिल्हा पोलिस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलिस अधीक्षक बी. रेड्डी आणि पोलिस निरीक्षक शंकर शेळके यांनी केले. प्रत्यक्ष छापेमारी पोलीस उपनिरीक्षक गोपाल जाधव आणि त्यांच्या पथकाने केली. स्थानिक नागरिकांनी या कारवाईचे स्वागत केले असून गावात अवैध दारू विक्रीमुळे समाजात होणारा अपाय थांबेल, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. पोलिसांनीही अशा अवैध धंद्यांवर सातत्याने कठोर कारवाई सुरूच राहील, असा इशारा दिला आहे.
