अकोला न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : अमेरिकेने भारतावर ५० टक्के टॅरिफ लादल्यानंतर दोन देशांमधील संबंध तणावपूर्ण झाले आहेत. या पार्श्वभूमीवर चीनने भारताचा खुला पाठिंबा दिला आहे. चीनचे दिल्लीतील राजदूत झू फेहोंग यांनी गुरुवारी म्हटले की अमेरिका हा ‘दादा’ आहे, जो टॅरिफचा वापर करून वेगवेगळ्या देशांकडून जास्त किंमत मिळवण्याचा प्रयत्न करतो. तसेच भारतावर अमेरिकेने लादलेल्या टॅरिफविरोधात चीन ठामपणे उभा राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
चीनचा खुला पाठिंबा
राजदूत झू फेहोंग यांनी नवी दिल्लीमध्ये आयोजित थिंक टँक कार्यक्रमात सांगितले की, भारतावर टॅरिफ लादण्याच्या अमेरिकेच्या निर्णयाचा चीन विरोध करतो. जागतिक व्यापर संघटना (WTO) केंद्रस्थानी असलेल्या बहुराष्ट्रीय व्यापार प्रणालीला सुरक्षित ठेवण्यासाठी चीन भारताच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील. त्यांच्या मते, जागतिक व्यापारात एकसमान व ऑर्डरली मल्टिपोलार वर्ल्ड तयार करण्यासाठी चीन आणि भारत यांच्याकडे मोठी जबाबदारी आहे.
अमेरिकेची दादागिरी
चीनच्या राजदूतांनी ट्रम्प प्रशासनावर टीका करताना म्हटले की, “अमेरिकेने मुक्त व्यापाराचा दीर्घकाळ फायदा घेतला, पण आता टॅरिफचा वापर वेगवेगळ्या देशांकडून जास्त किंमत मिळवण्यासाठी साधन म्हणून करतो. भारतावर ५० टक्के टॅरिफ लादणे आणि आणखी लावण्याची धमकी देणे हे दादागिरीच्या कृतींच्या श्रेणीत येते. अशा कृतींवर गप्प राहणे किंवा तडजोड करणे फक्त दादागिरी करणाऱ्यांना बळ देते.”
भारत-चीन संबंधात सुधारणा
झू फेहोंग यांच्या मते, जागतिक व्यापर प्रणाली टिकवण्यासाठी चीन भारताबरोबर समन्वय साधत राहील. यामुळे जागतिक व्यापार व्यवस्थेत स्थिरता राखण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यांनी असेही सांगितले की, एका देशाचे वर्चस्व स्थापन करण्यासाठी परदेशी मालावर कर लादणे, स्वदेशी उद्योगांचे संरक्षण करणे ही पद्धत पॉवर पॉलिटिक्सचीच एक उदाहरण आहे, ज्यावर भारत-चीनने जागतिक स्तरावर समानता व संतुलन राखण्याचे प्रयत्न करायला हवे.
