WhatsApp

खोळद गावात पिढी नदीच्या पुरात युवकाचा मृत्यू; पोळ्याच्या तयारीत घडली दुर्घटना

Share

अकोला न्यूज नेटवर्क
मूर्तीजापूर :
खोळद गावात पोळा सणाच्या तयारीदरम्यान एक हृदयद्रावक घटना घडली आहे. बैलांना अंघोळ घालण्यासाठी गेलेला शंतनू अविनाश मानकर (वय २५) हा युवक शनिवारी सकाळी पिढी नदीच्या पुरात वाहून गेला. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे.



सणाच्या उत्साहात घडली दुर्घटना
खोळद गावात सकाळी साडेआठ ते नऊच्या दरम्यान पोळ्याच्या सणासाठी बैल चारण्यासाठी व त्यांना नदीत अंघोळ घालण्यासाठी ग्रामस्थ गेले होते. त्याच वेळी अविनाश किसनराव मानकर यांचा एकुलता एक मुलगा शंतनू हा नदीकाठी गेला. मात्र पिढी नदीला आलेल्या पुराच्या लाटांमध्ये तो सापडला आणि वाहून गेला. गावकऱ्यांनी मदत करण्याचा प्रयत्न केला, मात्र पाण्याच्या जोरासमोर सारे प्रयत्न अपुरे पडले.

एकुलत्या मुलाच्या मृत्यूने मानकर कुटुंब उध्वस्त
शंतनू हा गावात आरोचा व्यवसाय करून उदरनिर्वाह करत होता. साधे, मेहनती जीवन जगणाऱ्या या युवकाचा अकस्मात मृत्यू झाल्याने मानकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. गावकऱ्यांच्या मते, शंतनू स्वभावाने शांत, सर्वांना मदत करणारा व मेहनती होता. एकुलत्या मुलाच्या मृत्यूने कुटुंब उघड्यावर पडल्यासारखे झाले आहे.

प्रशासनाची तत्काळ धाव
घटनेची माहिती मिळताच मूर्तीजापूरचे तहसीलदार कुमारी शिल्पा बोबडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक पोलीस व महसूल विभागाचे पथक घटनास्थळी पोहोचून शोधमोहीम हाती घेत आहे. नदीतील पुराचे पाणी ओसरल्यावर मृतदेह शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. प्रशासनाने ग्रामस्थांना नदीकाठी सावधानता बाळगण्याचे आवाहन केले आहे.



Watch Ad

Leave a Comment