अकोला न्यूज नेटवर्क
अकोला : अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यातील निंबी खुर्द येथील जिल्हा परिषद शाळा आपल्या शिक्षण, शिस्त आणि शरीरसौष्ठवाच्या अनोख्या त्रिसूत्रीमुळे राज्यभर चर्चेचा विषय बनली आहे. या शाळेच्या अभिनव प्रयोगाची दखल शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी घेतली असून, त्यांनी व्हिडीओ कॉलद्वारे शिक्षक आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांचे कौतुक केले. याशिवाय, आमदार अमोल मिटकरी यांनीही या शाळेला १० लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.
दोन शिक्षकांचे अभिनव कार्य
निंबी खुर्द येथील जिल्हा परिषद शाळा एका गवताळ माळरानावर उभी आहे. ही शाळा आपल्या दोन शिक्षकांच्या प्रयत्नांमुळे ‘मस्ती की पाठशाळा’ बनली आहे. शिक्षक संतोष पाचपोर आणि समाधान जावळे यांनी केवळ पुस्तकी ज्ञान न देता, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर दिला आहे. विशेष म्हणजे, शिक्षक संतोष पाचपोर हे एक नामवंत बॉडी बिल्डर आहेत आणि त्यांनी आपल्या या कौशल्याचा उपयोग विद्यार्थ्यांच्या शरीरसौष्ठव आणि फिटनेससाठी केला आहे. त्यांच्या या प्रयत्नांमुळे ही द्विशिक्षकी शाळा शिक्षण, उपक्रम आणि क्रीडा क्षेत्रात एक आदर्श बनली आहे.
आमदार आणि शिक्षणमंत्र्यांकडून कौतुक
या शाळेच्या यशोगाथेची माहिती ‘अकोला न्यूज नेटवर्क’ने प्रसारित केल्यानंतर राज्यभर तिची चर्चा सुरू झाली. बातमीची दखल घेत आमदार अमोल मिटकरी यांनी शाळेला भेट दिली. त्यांनी स्थानिक विकास निधीतून १० लाख रुपयांची भरीव मदत जाहीर केली. तसेच, आपल्या आमदार निधीतून शाळेला दोन संगणक देण्याचे आश्वासनही दिले. त्यांच्या या भेटीदरम्यान शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी व्हिडीओ कॉल करून विद्यार्थी आणि शिक्षकांशी संवाद साधला. त्यांनी त्यांच्या कार्याची प्रशंसा केली आणि शाळेला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.
एकमेकांच्या सहभागातून घडलेली यशोगाथा
निंबी खुर्दच्या शाळेची ही यशोगाथा केवळ दोन शिक्षकांच्या प्रयत्नांमुळेच नाही, तर गावकरी, विद्यार्थी आणि लोकप्रतिनिधींच्या सहभागामुळेही शक्य झाली आहे. गावातील नागरिकांच्या पाठिंब्यामुळे आणि शिक्षकांच्या अथक परिश्रमामुळे शाळेने एक नवा आदर्श निर्माण केला आहे. या शाळेच्या कार्याची दखल घेतल्याबद्दल गावकऱ्यांनी ‘अकोला न्यूज नेटवर्क’चे आभार मानले आहेत. ही यशोगाथा अकोल्याच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी एक प्रेरणादायी उदाहरण ठरली आहे.
