अकोला न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : भारताने रशियाकडून कच्च्या तेलाची आयात केल्यामुळे अमेरिकेने भारतावर ५० टक्के टॅरिफ लादला आहे. यावरून भारत आणि अमेरिकेचे संबंध तणावपूर्ण बनले आहेत. अमेरिकेने वारंवार दबाव आणूनही भारताने रशियासोबतचा तेल खरेदीचा करार कायम ठेवला होता. यामुळे भारताने अमेरिकेला एकप्रकारे मोठा धक्का दिला होता. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राष्ट्राध्यक्ष पुतिन आणि डोनाल्ड ट्रम्प यांची १५ ऑगस्ट रोजी अलास्कामध्ये भेट झाली. या भेटीचा मुख्य उद्देश युक्रेन युद्ध होता, असे सांगितले जात असले तरी, टॅरिफच्या मुद्द्यावरही चर्चा झाल्याचे म्हटले जात आहे.
पुतिन आणि ट्रम्प यांच्यात वाढती जवळीक
अलास्कामधील भेटीनंतर पुतिन यांनी ट्रम्प यांना मॉस्को भेटीचे थेट निमंत्रण दिले. पुतिन म्हणाले, “पुढची भेट मॉस्कोमध्ये…” त्यावर ट्रम्प यांनीही आनंदाने प्रतिक्रिया देत ‘वाह… हे खास आहे…’ असे म्हटले. या दोन्ही नेत्यांमधील जवळीक पाहून अनेकांना धक्का बसला आहे. विशेषतः भारताने रशियासाठी अमेरिकेसोबत पंगा घेतलेला असताना ही घटना घडल्यामुळे भारतीय नागरिकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. रशिया भारताला धोका देत नाहीये ना, अशी शंकाही काहीजणांकडून व्यक्त केली जात आहे.
भारत-रशिया संबंधांवर प्रश्नचिन्ह?
गेल्या काही वर्षांपासून भारत आणि रशियाचे संबंध खूप चांगले आहेत. अनेक आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर रशियाने भारताला पाठिंबा दिला आहे. युक्रेन युद्धाच्या काळातही भारताने तटस्थ भूमिका घेतली आणि रशियासोबतचे संबंध टिकवून ठेवले. पण आता रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी थेट अमेरिकेच्या माजी राष्ट्राध्यक्षांशी जवळीक दाखवल्यामुळे भविष्यात भारताच्या परराष्ट्र धोरणात काही बदल होतील का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. सध्या दोन्ही राष्ट्राध्यक्षांनी युक्रेन युद्धावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नसली तरी, टॅरिफसारख्या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाल्याचे संकेत मिळत आहेत. या सगळ्या घडामोडींचा भारताच्या आंतरराष्ट्रीय संबंधांवर काय परिणाम होतो, हे येणारा काळच ठरवेल.