नवी दिल्ली: गेल्या काही वर्षांपासून ईव्हीएमच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असतानाच, सर्वोच्च न्यायालयाने एका प्रकरणात ईव्हीएमची फेरमतमोजणी करून एक ऐतिहासिक निकाल दिला आहे. हरियाणामधील पानिपत जिल्ह्यातील बुआना लखू ग्रामपंचायत निवडणुकीतील वाद थेट सर्वोच्च न्यायालयात पोहोचला होता. त्यानंतर न्यायालयाने सर्व ईव्हीएम आणि संबंधित रेकॉर्डची व्हिडिओ रेकॉर्डिंगच्या उपस्थितीत फेरमतमोजणी केली, ज्यात तीन वर्षांनंतर निवडणुकीचा निकाल बदलला. या निर्णयामुळे मोहित कुमार यांचा सरपंचपदी विजय झाल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
काय आहे प्रकरण?
हे प्रकरण २०२२ मध्ये झालेल्या बुआना लखू ग्रामपंचायतीच्या निवडणुकीशी संबंधित आहे. या निवडणुकीत कुलदीप सिंह यांना विजयी घोषित करण्यात आले होते, तर मोहित कुमार यांचा पराभव झाला होता. मोहित कुमार यांनी निवडणूक निकालाला आव्हान देत सुरुवातीला इलेक्शन ट्रिब्युनलकडे दाद मागितली. ट्रिब्युनलने एका बूथवरील मतांची फेरगणती करण्याचे आदेश दिले होते, पण पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने तो आदेश रद्द केला. त्यानंतर कुमार यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली.
सर्वोच्च न्यायालयाचा हस्तक्षेप आणि निकाल
या प्रकरणाची सुनावणी झाल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण निर्णय दिला. न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने ईव्हीएम आणि इतर सर्व रेकॉर्ड न्यायालयासमोर सादर करण्याचे आदेश दिले. त्यानंतर ११ ऑगस्ट रोजी न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती एन. कोटीश्वर सिंह यांचा समावेश असलेल्या या खंडपीठाने व्हिडीओ चित्रीकरणाच्या उपस्थितीत न्यायालयाच्या रजिस्ट्रार कावेरी यांच्याकडून सर्व बूथवरील मतांची फेरगणती केली. या फेरगणतीत मोहित कुमार यांना १,०५१ मते, तर कुलदीप सिंह यांना १,००० मते मिळाल्याचे समोर आले, ज्यामुळे मोहित कुमार यांचा ५१ मतांनी विजय झाला.
अखेर न्याय मिळाला
न्यायालयाने आपल्या आदेशात पानिपतच्या डेप्युटी कमिशनर तथा निवडणूक अधिकाऱ्यांना दोन दिवसांच्या आत मोहित कुमार यांना बुआना लखू ग्रामपंचायतीचे निवडून आलेले सरपंच म्हणून घोषित करणारी अधिसूचना जारी करण्याचे निर्देश दिले. तसेच, कुमार यांना तात्काळ पद स्वीकारण्याचा आणि आपली कर्तव्ये पार पाडण्याचा अधिकार असेल असेही स्पष्ट केले. या निर्णयामुळे तीन वर्षांपासून सुरू असलेल्या न्यायालयीन लढाईला पूर्णविराम मिळाला असून, ईव्हीएमच्या वापरासंदर्भात ही फेरगणती आणि निकालातील बदल ही एक महत्त्वाची घटना मानली जात आहे.
