अकोला न्यूज नेटवर्क
छत्रपती संभाजीनगर : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने राज्यातील काही शहरांमध्ये महानगरपालिकांनी लागू केलेल्या मांसविक्री आणि कत्तलीच्या बंदीचा निषेध करण्यासाठी एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी आज (१५ ऑगस्ट) बिर्याणी पार्टीचे आयोजन केले. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि छत्रपती संभाजीनगरच्या पालिका आयुक्तांनाही या पार्टीचे निमंत्रण दिले. देशाच्या सर्वात मोठ्या सणाच्या दिवशीच आपल्याला बिर्याणी खायची आहे, असे म्हणत त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली.
मनपाच्या निर्णयावर जोरदार टीका
जलील म्हणाले की, आपला देश लोकशाही पद्धतीने चालणारा आहे, पण त्यात काही महापालिका आयुक्त असे निर्णय घेत आहेत. सरकारने जर धोरणात्मक निर्णय घेतला असता तर तो मान्य केला असता, पण आयुक्तांच्या पातळीवर अशा प्रकारचे ‘तुघलकी फर्मान’ काढणे चुकीचे आहे. त्यांनी जाहीर केलेल्या या ‘चिकन बिर्याणी-मटण कुर्मा’ पार्टीसाठी सर्व आयुक्तांना निमंत्रण दिल्याचेही स्पष्ट केले. काही महापालिकांनी, ज्यात कल्याण-डोंबिवली, नागपूर, अमरावती, मालेगाव आणि छत्रपती संभाजीनगरचा समावेश आहे, मांस, मासे आणि अंडी यांच्या विक्री आणि कत्तलीवर बंदी घातली आहे. या बंदीलाच जलील यांनी विरोध दर्शवला आहे.
संजय शिरसाट यांच्या टीकेला प्रतिउत्तर
शिवसेना (शिंदे गट) नेते संजय शिरसाट यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना इम्तियाज जलील यांनी त्यांच्यावर वैयक्तिक हल्ला चढवला. ‘संजय शिरसाट काय खातात हे महाराष्ट्राला माहीत आहे. मी बाजारातून गेलो तर माझ्या बॅगेत मटण-चिकन दिसेल आणि त्यांच्या बॅगेत काय दिसते हे महाराष्ट्राला माहीत आहे,’ अशा शब्दांत त्यांनी शिरसाट यांच्यावर पलटवार केला. ‘मी छोटा माणूस आहे, माझी टीआरपीची चिंता करू नका, तुम्ही समाजकल्याण सोडून कुटुंब कल्याण केले याचा विचार करा,’ असा टोलाही त्यांनी लगावला.
प्रशासनावर संतप्त सवाल
‘खायला बंदी नाही असे म्हणत आहेत, मग दुकानेच बंद असतील तर आकाशातून मटण आणावे का?’ असा संतप्त सवाल जलील यांनी प्रशासनाला विचारला. अशा तुघलकी फर्मानांना वारंवार जनतेने विरोध केला पाहिजे. तसेच, त्यांनी राज ठाकरे यांच्या भूमिकेचे समर्थन केले. राज ठाकरे यांनीही स्वातंत्र्यदिनी मांसावर बंदी घालण्याच्या निर्णयाचा विरोध केला होता. महत्वाच्या मुद्द्यांवरून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी असे निर्णय घेतले जात असल्याचा आरोपही जलील यांनी केला. रमजान आणि बकरी ईदच्या दिवशी दारू विक्री बंद करावी, अशी मागणी त्यांनी सरकारकडे केली. तसेच, त्यांनी खाटीक समाजाला आजच्या दिवशी दुकाने चालू ठेवण्याचे आवाहन केले.
