अकोला न्यूज नेटवर्क
तुळजापूर : राज्याचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी तुळजाभवानी मंदिराच्या विकासावरून राज्य सरकारवर गंभीर आरोप केला आहे. तुळजाभवानी मातेच्या मंदिराचा ऐतिहासिक गाभारा पाडण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. मात्र, भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हे आरोप फेटाळून लावत आव्हाड यांच्यावर प्रसिद्धीसाठी स्टंट करत असल्याची टीका केली आहे.
जितेंद्र आव्हाड यांचा आरोप
जितेंद्र आव्हाड यांनी मंगळवारी तुळजापूर येथील आई तुळजाभवानी मंदिरात जाऊन दर्शन घेतले आणि सुरू असलेल्या कामांची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, “मी सनातन हिंदू नसलो तरी हिंदू आहे. देवीच्या मंदिरातील ऐतिहासिक गाभाऱ्याला हात लावू देणार नाही.” छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या मंदिराचा गाभारा हा महाराष्ट्राचा इतिहास आहे. ज्या दगडांनी शिवाजी महाराजांना पाहिले, ज्या पायऱ्यांवरून ते वर-खाली गेले, त्या पायऱ्या आणि गाभारा तोडण्याचा अधिकार कुणालाही नाही, असे त्यांनी म्हटले. मंदिराच्या बाहेरील सुशोभीकरण कामांना आपला विरोध नसून, गाभाऱ्याला धक्का लावू नये, अशी त्यांची भूमिका आहे.
आव्हाड यांची सोशल मीडिया पोस्ट
जितेंद्र आव्हाड यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत सरकारवर थेट हल्ला चढवला. “तुळजापूर येथील आई तुळजाभवानी मातेच्या मंदिराचा गाभारा पाडण्याच्या बेतात हे राज्य सरकार आहे. हा आमच्या संस्कृतीवर आणि श्रद्धेवर घाला आहे. छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेले हे मंदिर लाखो-करोडो भक्तांच्या आस्थेचे प्रतीक आहे,” असे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
भाजप कार्यकर्त्यांचे आंदोलन
जितेंद्र आव्हाड मंदिरात पाहणी करत असताना भाजप कार्यकर्त्यांनी प्रचंड गोंधळ घातला. त्यांनी आव्हाड यांच्या गाडीसमोर ठिय्या आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी केली. भाजप कार्यकर्त्यांनी आरोप केला की, जितेंद्र आव्हाड केवळ प्रसिद्धीसाठी हा स्टंट करत आहेत. त्यांनी यापूर्वी सनातन धर्म आणि हिंदू देवी-देवतांवर टीका केली होती. आता ते स्वत:ला हिंदू म्हणत आहेत, यावर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “आव्हाड यांनी ठाण्यात बसून तुळजाभवानी मातेची तलवार चोरीला गेली, असे बेताल वक्तव्य केले होते. ते फक्त राजकीय षडयंत्र करत आहेत,” अशी टीका भाजप कार्यकर्त्यांनी केली.
