अकोला न्यूज नेटवर्क
पुणे : खेड तालुक्यातील कुंडेश्वर देवस्थानच्या दर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या गाडीचा घाटात भीषण अपघात झाला. या अपघातात १० महिलांचा जागीच मृत्यू झाला असून २१ महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. अपघाताला जबाबदार कोण, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, चालकाला सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्याखाली अटक करण्यात आली आहे.
अपघाताचा थरार आणि मृतांचा आकडा
कुंडेश्वर देवस्थानाकडे जाणाऱ्या घाटाच्या मध्यभागी ४० महिलांना घेऊन जाणाऱ्या पिकअप गाडीचा हा अपघात झाला. घाट चढत असताना चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि गाडी मागे येत १०० फूट खोल दरीत कोसळली. या दुर्घटनेत १० महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर २१ महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
अपघाताला नेमके कोण जबाबदार?
या अपघातानंतर अपघाताला जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, कुंडेश्वर देवस्थानला क वर्ग दर्जा मिळाल्यानंतर घाटातील रस्त्यांची कामे झाली, पण रस्ते खड्डेमय आहेत. तसेच, घाट तयार करताना तांत्रिक बाबींकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोपही होत आहे. स्थानिक नागरिकांच्या मते, ही गाडी ओव्हरलोड होती. याच दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणी हृषीकेश करंडे नावाच्या चालकाला अटक केली असून त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अपघातापूर्वीचा शेवटचा व्हिडिओ व्हायरल
या दुर्दैवी घटनेआधीचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये अपघाताच्या काही मिनिटांपूर्वीच पिकअप गाडीतील महिला भाविक भक्तिभावाने विठ्ठलाचे नामस्मरण करताना आणि गाणी म्हणत हसत-खेळत दर्शनासाठी निघाल्याचे दिसत आहे. भक्तिमय वातावरणात सुरू झालेला हा प्रवास काही क्षणातच शोकांतिकेत संपल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
