WhatsApp

मानवी तस्करीचा भीषण प्रकार; १२ वर्षांच्या बांगलादेशी मुलीवर २०० हून अधिक जणांकडून अत्याचार

Share

अकोला न्यूज नेटवर्क
विरार : मुंबईजवळील वसई तालुक्यातील नायगाव पूर्व येथे मानवी तस्करीचा एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका १२ वर्षांच्या बांगलादेशी अल्पवयीन मुलीवर गेल्या तीन महिन्यांत २०० हून अधिक व्यक्तींनी लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले आहे. मीरा-भाईंदर-वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या मानव तस्करी प्रतिबंधक पथकाने (AHTU) स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने या मुलीची सुटका केली असून, या प्रकरणात नऊ दलालांना अटक केली आहे. या घटनेमुळे संपूर्ण वसई-विरार परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.



बांगलादेश ते मुंबई असा भयानक प्रवास
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी अवघ्या बाराव्या वर्षी बांगलादेशातून कोलकात्यात आणली गेली. तेथे तिची बनावट कागदपत्रे तयार करण्यात आली आणि तिचा ताबा घेण्यात आला. त्यानंतर तिला गुजरातमधील नडियाद येथे काही दिवस ठेवून तिच्यावर अत्याचार करण्यात आले. या अत्याचाराचे फोटो काढून तिला ब्लॅकमेल केले गेले आणि वेश्याव्यवसायात ढकलण्यात आले. पुढे तिला मुंबईत आणून नायगावच्या स्टार सिटी परिसरातील एका वसाहतीत ठेवण्यात आले, जिथे तिला दररोज नव्या ग्राहकांकडे पाठवले जात होते.

२०० हून अधिक जणांकडून अत्याचार
पोलिसांच्या तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, गेल्या तीन महिन्यांच्या काळात या अल्पवयीन मुलीवर तब्बल २०० हून अधिक ग्राहकांकडून लैंगिक अत्याचार झाले. मुलगी अल्पवयीन असल्यामुळे तिचा मानसिक आणि शारीरिक छळ अत्यंत क्रूर पद्धतीने करण्यात आला. या प्रकरणातील भीषणता पाहून पोलीसही हादरले आहेत.

९ दलालांना अटक
या प्रकरणी पोलिसांनी २६ जुलै रोजी कारवाई करत नऊ दलालांना अटक केली आहे. अटक झालेल्यांमध्ये चार बांगलादेशी नागरिकांचा समावेश आहे. मोहम्मद खालिद बपरी, जुबेर हारून शेख, शमीम सरदार, रुबी बेगम खालिद, तसेच भारतीय नागरिक उज्जल कुंडू, पर्वीन कुंडू, प्रितीबेन मोहिदा, निकेत पटेल आणि सोहेल शेख अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पोलीस या प्रकरणातील इतर आरोपींचा शोध घेत आहेत.

Watch Ad

भविष्यासाठी सुरक्षित ठिकाणी व्यवस्था सुटका केलेल्या अल्पवयीन मुलीला सध्या उल्हासनगर येथील बालकल्याण समितीच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. तिच्या प्रवास परवानगीपत्र आणि इतर कायदेशीर कागदपत्रांची प्रक्रिया सुरू आहे. सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तिला तिच्या कुटुंबाच्या स्वाधीन करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेने अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!