अकोला न्यूज नेटवर्क
वडोदरा : पतीला मूल होऊ शकत नाही म्हणून चक्क सासरा आणि नणंदेच्या पतीनेच एका सुनेवर वारंवार बलात्कार केल्याची धक्कादायक घटना गुजरातच्या वडोदरा शहरात उघडकीस आली आहे. या अमानुष कृत्यामुळे पीडित महिला गर्भवती राहिली, मात्र तिचा गर्भपात झाला. यानंतर पीडितेने हिंमत दाखवत पोलिसांत धाव घेतली. नवापुरा पोलिसांनी या प्रकरणी सासरा आणि नणंदेच्या पतीवर बलात्काराचा, तर पतीवर ब्लॅकमेलिंगचा गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.
पतीच्या नपुंसकत्वामुळे सुरू झाली अत्याचाराची मालिका
४० वर्षीय पीडित महिलेने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, फेब्रुवारी २०२४ मध्ये तिचा विवाह झाला. लग्नानंतर काही आठवड्यातच सासरच्यांनी तिला ती वयामुळे गर्भवती राहू शकत नसल्याचे सांगितले. नंतर वैद्यकीय तपासणीत तिच्या पतीच्या शुक्राणूंची संख्या कमी असल्याचे स्पष्ट झाले. यामुळे तिला इन विट्रो फर्टिलायझेशन (IVF) करण्याचा सल्ला देण्यात आला. परंतु, IVF अयशस्वी झाल्यानंतर तिने पुढील उपचारांना नकार दिला आणि मूल दत्तक घेण्याचा पर्याय सुचवला. मात्र, सासरच्यांनी याला नकार दिला. यानंतरच अत्याचाराची ही भयानक मालिका सुरू झाली.
सासऱ्याचा अत्याचार, पतीचा पाठिंबा
पीडितेने पोलिसांना सांगितले की, जुलै २०२४ मध्ये ती खोलीत झोपली असताना, तिच्या सासऱ्याने तिच्यावर बलात्कार केला. तिने आरडाओरड केल्यानंतर सासऱ्याने तिला मारहाणही केली. हा प्रकार तिने पतीला सांगितल्यावर त्याने तिला गप्प राहण्यास सांगितले आणि “मला मूल हवे आहे, त्यामुळे याबद्दल कोणालाही सांगू नकोस” असे म्हटले. इतकेच नाही, तर तिचे खासगी फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन पतीने तिला ब्लॅकमेल केले. पतीच्या पाठिंब्यामुळे सासऱ्याने तिच्यावर अनेकवेळा अत्याचार केले. डिसेंबर २०२४ मध्ये तिच्या नणंदेच्या पतीनेही तिच्यावर बलात्कार केला आणि त्यानंतर अनेकदा हे कृत्य केले.
गर्भपातानंतर प्रकरण उघड
अत्याचाराच्या या भयानक चक्रानंतर अखेर जून महिन्यात पीडित महिला गर्भवती राहिली. मात्र, जुलै महिन्यात तिचा गर्भपात झाला. या घटनेमुळे पीडिता पूर्णपणे खचून गेली. तिने प्रचंड मानसिक धक्क्यातून सावरत अखेर पोलिसांकडे तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणी रविवारी गुन्हा दाखल करून सासरा आणि नणंदेच्या पतीवर बलात्कार आणि लैंगिक शोषणाचे आरोप लावले आहेत, तर पतीवर ब्लॅकमेलिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलिसांकडून सुरू असून, लवकरच यातील दोषींना कठोर शिक्षा होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
