अकोला न्यूज नेटवर्क
अकोला : बांधकाम मजूर संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने प्रलंबित मागण्यांसाठी आज अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात अकोला पश्चिमचे आमदार साजिद खान पठाण यांनी उपस्थिती दर्शवून मजुरांना मार्गदर्शन केले. आमदार पठाण यांनी या वेळी सरकारवर जोरदार टीका केली, तर जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार मजुरांनी व्यक्त केला.
सरकारवर दबाव आणण्यासाठी आंदोलन आवश्यक
या आंदोलनात बोलताना आमदार पठाण म्हणाले की, “देशात आणि राज्यात आंदोलन करणाऱ्यांना दबावतंत्राखाली आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.” लोकशाही आणि भारतीय संविधान धोक्यात असून, मानवता टिकवण्यासाठी असे आंदोलन करणे महत्त्वाचे आहे, असेही ते म्हणाले. सरकारने मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास त्यांना योग्य उत्तर देण्यासाठी आंदोलनाचा मार्ग अवलंबणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले.
संसदेच्या मनमानी कारभारावर टीका
आमदार पठाण यांनी सरकारसोबतच संसदेच्या कामकाजावरही शायरीच्या माध्यमातून टीका केली. “जब रास्ते सुनसान हो जायेंगे, तो संसद पागल हो जाएगा,” असे म्हणत त्यांनी सरकार मनमानी कारभार करत असल्याचा आरोप केला. या मनमानी कारभाराला विरोध करण्यासाठी जनतेने रस्त्यावर उतरून आंदोलन करणे आवश्यक आहे, असेही त्यांनी सांगितले.
मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार
या आंदोलनात सहभागी झालेल्या मजुरांनी त्यांच्या प्रलंबित मागण्या पूर्ण होईपर्यंत लढा सुरू ठेवण्याचा निर्धार केला. “आपल्या मागण्या पूर्ण होईपर्यंत हे आंदोलन कायम ठेवावे,” असे आवाहन आमदार पठाण यांनी मजुरांना केले, तर त्याला सकारात्मक प्रतिसाद देत मजुरांनीही एकजुटीने त्यांच्या हक्कांसाठी लढण्याची शपथ घेतली.
