अकोला न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबईतील कबुतरखाना बंदीचा वाद आता चांगलाच तापला आहे. मुंबई उच्च न्यायालयात हे प्रकरण प्रलंबित असतानाच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) या वादात उडी घेतली आहे. मनसेचे ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर यांनी पत्रकार परिषदेत बोलताना कबुतरांपेक्षा माणसांचे आरोग्य अधिक महत्त्वाचे असल्याचे ठामपणे सांगितले. “माणसं महत्त्वाची की कबुतरं महत्त्वाची, याचा विचार करण्याची आवश्यकता आहे,” असे म्हणत त्यांनी कबुतरखाना बंदीच्या निर्णयाचे समर्थन केले.
कबुतरांमुळे आरोग्यावर गंभीर परिणाम मनसेने कबुतरखान्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर होणाऱ्या गंभीर परिणामांवर भर दिला. नांदगावकर म्हणाले की, “कबुतरांमुळे माणसांचा जीव धोक्यात येणार असेल, तर माणुसकीच्या दृष्टीने विचार करणे आवश्यक आहे.” एका डॉक्टरांनी कबुतरांमुळे होणाऱ्या नुकसानाबद्दल सांगितले असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यामुळे माणसांच्या आरोग्याची काळजी घेणे आणि पर्यावरणाला नुकसान पोहोचणार नाही, हे पाहणे महत्त्वाचे आहे.
कोर्टाच्या निर्णयाला मनसेचा पाठिंबा दादरचा प्रसिद्ध कबुतरखाना बंद करण्याच्या निर्णयाला मनसेने पूर्ण पाठिंबा दिला आहे. बाळा नांदगावकर यांनी सांगितले की, “कोर्टाने जो निर्णय घेतला आहे, आम्ही त्या निर्णयाच्या बाजूने आहोत.” तसेच, सर्वोच्च न्यायालयाने या संदर्भात दाखल केलेली विशेष रीट पिटीशन फेटाळून लावल्याचेही त्यांनी सांगितले. आता हा वाद मुंबई उच्च न्यायालयात सोडवला जाईल.
ज्या सोसायट्यांमध्ये राहता, तिथेच कबुतरखाना सुरू करा नांदगावकरांनी कबुतरांना खाऊ घालणाऱ्यांना एक खोचक सल्ला दिला. “जीवदया आणि भूतदया आम्हालाही करावीशी वाटते, पण याचा अर्थ असा नाही की लोकांना त्रास होत असतानाही ती करत राहायची,” असे ते म्हणाले. पुढे ते म्हणाले की, “ज्या सोसायट्यांमध्ये आपण फ्लॅट घेतो, तिथे स्विमिंगपूल, जिम यांसारख्या गोष्टींची सोय असते. मग त्याच सोसायटीच्या बाजूला एखादा कबुतरखाना सुरू केला, तर काय बिघडलं? त्यामुळे जवळच्या जवळ दाणापाणीही देता येईल आणि लोकांच्या आरोग्याची काळजीही घेता येईल,” असे म्हणत त्यांनी कबुतरप्रेमींना त्यांच्या सोसायट्यांमध्येच कबुतरखाने सुरू करण्याचे आवाहन केले.

८० ते ९० टक्के जैन समाज विरोधात या वादात जैन समाजातील काही लोक कबुतरखाना बंदीला विरोध करत असल्याचे दिसत असले, तरी नांदगावकरांनी सांगितले की, “८० ते ९० टक्के जैन समाज या निर्णयाच्या विरोधात नाही. कारण त्यांनाही यापासून होणारे नुकसान समजले आहे.” केवळ एका जैन मुनींनी याला विरोध केला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.