WhatsApp

निवडणूक आयोग भाजपाची शाखा बनली आहे – संजय राऊतांचा आरोप

Share

अकोला न्यूज नेटवर्क
दिल्ली – संसदेतील ३०० पेक्षा जास्त खासदारांनी लोकशाहीच्या रक्षणासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन छेडले. या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी निवडणूक आयोगावर तीव्र हल्लाबोल केला. “गेल्या १० वर्षांत आयोग भाजपाची शाखा झाला आहे. टी.एन. शेषन यांचा अभ्यास करून आदर्श आचारसंहितेचे पालन कसे करायचे हे शिकायला हवे,” असा टोला त्यांनी लगावला.



राहुल गांधींच्या लढाईला पाठिंबा
राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाच्या डेटावर केलेले संशोधन गंभीर आहे. आयोगाच्या संकेतस्थळावरच गैरप्रकार स्पष्ट दिसतात. “संसद हे लोकशाहीचे सर्वोच्च मंदिर, पण त्याच ठिकाणी चोऱ्या करून सत्तेवर आलेले लोक आहेत. आयोग हे त्या चोरांचे हस्तक आहे,” असे त्यांनी म्हटले.

३०० खासदारांना अडवले, धक्काबुक्की
३०० खासदार निवडणूक आयोगाकडे जाण्याच्या प्रयत्नात असताना दिल्ली पोलिसांनी त्यांना अडवले. बॅरिकेड्स, धक्काबुक्की आणि अडथळे यांचा सामना करावा लागला. “आम्ही अतिरेकी की दहशतवादी?” असा सवाल राऊतांनी उपस्थित केला.

‘हृदयविकाराचा झटका आला असता का?’
“जर ३०० खासदार आयोगासमोर उभे राहून निवेदन दिले असते, तर आयोगाला हृदयविकाराचा झटका आला असता का? आयोग नेमका कोणाला घाबरतोय?” असा थेट प्रश्न राऊतांनी विचारला. त्यांनी आयोगाला ‘रखवालदार नव्हे तर चोर’ असे संबोधत, तो विरोधकांना संपवण्याच्या कारस्थानात सहभागी असल्याचा आरोप केला.

Watch Ad

मोदी-शहा अजरामर नाहीत
राऊत म्हणाले, “मोदी, अमित शहा अजरामर नाहीत. सत्तेवर कायम कोणी राहत नाही. आयोगाच्या खुर्चीवर बसलेल्यांनी हे समजून घ्यावे. लोकशाही राहिली, तर देश राहील.” त्यांनी पोलिसांकडून अटकेदरम्यान संसदेत हजेरी रोखण्यात आल्याचा आरोप करत, सरकारने बिले गुपचूप मंजूर केल्याचे सांगितले. “हे सरकार सरळमार्गाने नव्हे तर लांड्यालबाड्या करून सत्तेवर आले आहे,” असा थेट आरोप राऊतांनी करत सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली.

Leave a Comment

error: Content is protected !!