WhatsApp

“देवेंद्र फडणवीसांना पळता भुई थोडी होईल”; उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल

Share

अकोला न्यूज नेटवर्क
मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांत शिवसेनेने रस्त्यावर उतरून आंदोलन सुरू केले असून, यावरून उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केले. ‘सत्ताधाऱ्यांशी संघर्ष करायला मर्द लागतो आणि तो मर्द आपल्या शिवसेनेत आहे’, असे म्हणत त्यांनी, ‘या भ्रष्टाचाऱ्यांचं करायचं काय? खाली डोकं वर पाय’, अशी घोषणा दिली. पण यांना डोकं असेल तर ना, यांना नुसते पाय आहेत सुरत आणि गुवाहाटीला पळून जायला, असा टोलाही त्यांनी लगावला.



उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांचा पाऊस: दिल्लीमध्ये इंडिया आघाडीतर्फे विरोधी खासदारांचा मोर्चा पोलिसांनी अडवल्याचा उल्लेख करत, उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘या सत्ताधाऱ्यांनी महाराष्ट्राला भ्रष्टाचाराच्या पहिल्या रांगेत आणि विकासाच्या रांगेत शेवटी बसवले आहे’. यांचा कारभार जनताभिमुख नसून, पैसे गिळणाऱ्यांचे तोंड आहे, अशी टीका त्यांनी केली. ‘कुणी डान्सबार चालवतंय, कुणी बॅगा घेऊन बसलंय, पण शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष द्यायला वेळ नाही,’ अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. देवेंद्र फडणवीस यांच्यावर बोलताना ते म्हणाले की, ‘फडणवीस भाजपाची परंपरा पुढे चालवणारे आहेत असं वाटलं होतं, पण त्यांनी गैरवर्तन करणाऱ्यांना फक्त समज देऊन सोडून दिले आहे.’ भ्रष्टाचाराचे पुरावे असूनही त्यांना सोडून देणार असाल तर मग धनकड कुठे आहेत याचेही उत्तर द्या, असा सवाल त्यांनी विचारला. धनकड यांचा राजीनामा का घेतला हे कळलेच नाही, त्यांना तडकाफडकी काढून गायब केले, त्यांना समज का दिली नाही, असा प्रश्नही उद्धव ठाकरेंनी विचारला.

‘चीनचा पॅटर्न भारतात राबवला जातोय?’ चीनमध्ये सरकारबद्दल कोणी काही बोलले तर तो माणूस गायब होतो. तसाच पॅटर्न भारतात राबवला जातोय का? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी विचारला. ‘उपराष्ट्रपती कुठे आहेत ते तरी दाखवा. त्यांची प्रकृती बिघडली असेल तर ते कुठल्या रुग्णालयात आहेत? की तुम्ही त्यांचं ऑपरेशन केलं? याचं उत्तर द्या,’ अशी मागणीही त्यांनी केली. सर्व शिवसैनिकांना उद्देशून ते म्हणाले, ‘मोदींनी जशी ‘चाय पे चर्चा’ केली होती तशी तुम्ही आता लोकांशी चर्चा करा. आता ‘भ्रष्टाचार पे चर्चा’ करा. भ्रष्टाचारी मंत्री जोपर्यंत हाकलले जात नाहीत तोपर्यंत आपले आंदोलन थांबणार नाही.’

देवेंद्र फडणवीसांची ‘थीफ मिनिस्टर’ म्हणून संभावना: उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी बोलताना तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. ‘मला देवेंद्र फडणवीस यांची कीव येते आहे’, असे सांगत ते म्हणाले, ‘तुमच्याकडे पाशवी बहुमत आहे, दिल्लीत तुमचे बाप बसले आहेत, तरीही तुम्ही भ्रष्टाचाऱ्यांना काढून टाकत नाही?’. फडणवीसांनी काही भ्रष्टाचार केला नाही, असे गृहीत धरले तरीही ते भ्रष्ट लोकांवर पांघरुण का घालतात? ‘भाजपा म्हणजे भ्रष्टाचारी जनता पक्ष’, असा आरोप करत, त्यांच्याकडे अध्यक्ष करायला माणूस नाही, तसे भ्रष्ट मंत्र्यांच्या जागीही कुणी मिळत नाही का? असा सवाल त्यांनी विचारला. फडणवीस यांनी सांगावे की मला या लोकांना काढायचे आहे, पण ‘सहन होत नाही आणि सांगता येत नाही’ असा दबाव आहे. ‘आमचं तर म्हणणं आहे की, झुगारून द्या सगळा दबाव’, असे उद्धव ठाकरे म्हणाले. काँग्रेसने देवेंद्र फडणवीस यांना ‘चीफ मिनिस्टर’ नाही तर ‘थीफ मिनिस्टर’ म्हटले आहे. तो एक चांगला शब्द दिला आहे. देवेंद्र फडणवीसांमध्ये थोडा जरी स्वाभिमान असेल तर वरचा दबाव पाहू नका. कारण इथला दबाव वाढला तर तुम्हाला पळता भुई थोडी होईल, असा थेट इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.

Watch Ad

Leave a Comment

error: Content is protected !!