अकोला न्यूज नेटवर्क
नागपूर : देशातील सर्वात लांब पल्ल्याच्या वंदे भारत एक्सप्रेसला पंतप्रधान नरेंद्र मोदी १० ऑगस्ट रोजी हिरवा झेंडा दाखवतील. ही गाडी नागपूरमधील अजनी येथून पुण्यासाठी धावणार असून, यामुळे नागपूर आणि पुणेदरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा वेळ वाचणार आहे. ही नवीन वंदे भारत एक्सप्रेस ८८१ किलोमीटरचे अंतर अवघ्या १२ तासांत पूर्ण करणार आहे. नागपूर-पुणे मार्गावरील या सेवेसोबतच पंतप्रधान आणखी दोन वंदे भारत गाड्यांना हिरवा झेंडा दाखवणार आहेत.
अजनी-पुणे वंदे भारत एक्सप्रेसचे वेळापत्रक आणि थांबे
रेल्वे मंत्रालयाने अजनी-पुणे वंदे भारत एक्सप्रेससाठी अधिकृत वेळापत्रक जाहीर केले आहे. ही गाडी सकाळी ९:५० वाजता अजनी येथून सुटेल आणि रात्री ९:५० वाजता पुण्यात पोहोचेल. या एक्सप्रेसला मार्गावर अनेक महत्त्वाच्या ठिकाणी थांबा देण्यात आला आहे. यात वर्धा, बडनेरा, अकोला, भुसावळ, जळगाव, मनमाड, दौंड, अहिल्यानगर आणि कोपरगाव या स्थानकांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केलेल्या मागणीनुसार या गाडीला श्री संत गजानन महाराज नगरी, शेगाव येथेही थांबा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, ही सेवा कोणत्या तारखेपासून नियमित सुरू होणार याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
उद्घाटन सोहळ्याची जय्यत तयारी
वंदे भारत एक्सप्रेसच्या शुभारंभाचा कार्यक्रम नागपूरच्या मुख्य रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक ८ वर आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या महत्त्वपूर्ण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर रेल्वे स्थानक परिसरात कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. बॉम्ब शोधक व नाशक पथक (बीडीडीएस) आणि डॉग स्क्वॉडची नेमणूक करण्यात आली आहे. रेल्वे पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे गेल्या दोन दिवसांपासून सातत्याने स्थानकावर येऊन सुरक्षा व्यवस्थेची पाहणी करत आहेत.