अकोला न्यूज नेटवर्क
रामनगर : उत्तराखंडच्या रामनगर शहरातून एक धक्कादायक आणि तितकेच गंभीर प्रकरण समोर आले आहे. ड्रग्जच्या व्यसनापायी एका १७ वर्षीय तरुणीने अनेक पुरुषांसोबत शरीरसंबंध ठेवले, ज्यामुळे १९ पुरुषांना एचआयव्हीची लागण झाली असल्याचा दावा करण्यात येत आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून आरोग्य आणि सामाजिक वर्तुळात चिंता व्यक्त केली जात आहे.
नेमकी घटना काय?
उत्तराखंडच्या नैनीताल जिल्ह्यातील गुलरघट्टी परिसरात गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये हे प्रकरण पहिल्यांदा समोर आले. एका १७ वर्षीय तरुणीला ड्रग्जचे व्यसन लागले होते. हे व्यसन भागवण्यासाठी तिच्याकडे पुरेसे पैसे नव्हते, त्यामुळे ती पैसे कमावण्यासाठी पुरुषांसोबत शरीरसंबंध ठेवू लागली. या दीड वर्षांच्या काळात तिच्या संपर्कात आलेल्या १९ पुरुषांना एचआयव्हीची लागण झाल्याचा आरोप आहे. हे प्रकरण समोर आल्यानंतर शहरात एकच चर्चा सुरू झाली आहे.
सोशल मीडियावरून उघडकीस
हे प्रकरण तेव्हा उघडकीस आले, जेव्हा एका तरुणाने सोशल मीडियावर याविषयी माहिती शेअर केली. त्याने ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट टाकून सांगितले की, “नैनीताल, उत्तराखंड येथे एका १७ वर्षीय मुलीमुळे १९ तरुणांना एचआयव्हीचा संसर्ग झाला आहे. ती ड्रग्जच्या आहारी गेली असून व्यसनासाठी पैसे मिळवण्यासाठी पुरुषांशी शारीरिक संबंध ठेवत होती. या पुरुषांना ती एचआयव्ही पॉझिटिव्ह असल्याची माहिती नव्हती. तिच्या संपर्कात काही विवाहित पुरुषही आले होते, ज्यांच्या पत्नींनाही आता एचआयव्हीची लागण झाली आहे.”
प्रशासनाकडून तपास सुरू
हे प्रकरण गंभीर आरोग्य समस्यांमुळे समोर आले. जेव्हा अनेक तरुणांना आरोग्याच्या तक्रारी जाणवू लागल्या, तेव्हा त्यांनी रामदत्त जोशी संयुक्त रुग्णालयातील एकीकृत समुपदेशन आणि चाचणी केंद्रात (ICTC) चाचण्या केल्या. या चाचण्यांमध्ये ते एचआयव्ही पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले. ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर या घटनेची गंभीर दखल घेण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिस व आरोग्य प्रशासन तपास करत असल्याची माहिती मिळत आहे.

कायदेशीर आणि सामाजिक प्रश्न
या घटनेमुळे अनेक सामाजिक आणि कायदेशीर प्रश्न निर्माण झाले आहेत. एकीकडे अल्पवयीन मुलीचा गैरवापर आणि तिच्या व्यसनाधीनतेचा प्रश्न आहे, तर दुसरीकडे तिच्याशी शारीरिक संबंध ठेवणाऱ्या पुरुषांनी केलेल्या कृत्याचाही मुद्दा चर्चेत आहे. अल्पवयीन मुलीशी शारीरिक संबंध ठेवणे हा कायद्याने दंडनीय गुन्हा आहे. या प्रकरणातील पीडित महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि अशा घटना रोखण्यासाठी प्रशासनाने कठोर पाऊले उचलणे गरजेचे आहे.