अकोला न्यूज नेटवर्क
अकोला : अकोला येथील जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये रुग्णाने भरून आणलेल्या नाश्त्यात पालीचे मुंडके आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. या गंभीर घटनेमुळे आरोग्य प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. येथे रुग्णांना नाश्ता दिला जातो मात्र हे फक्त कागदावरच असल्याने रुग्णांना बहरून नाश्ता आणावा लागत आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी काही दिवसांपूर्वीच आरोग्य प्रशासनाला सुविधा सुधारण्याबाबत सूचना दिल्या असतानाही ही घटना घडल्यामुळे रुग्णांच्या सुरक्षेबाबत गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे.
नाश्त्यातील धक्कादायक प्रकार
अकोला जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या ३२ क्रमांकाच्या वॉर्डमध्ये गोरेगाव येथील रुग्ण शेख सोहेल यांना दाखल करण्यात आले होते. रुग्णालयाच्या नियमांनुसार येथे नाश्ता दिला जातो मात्र वेळ निघून बराच वेळ होऊन देखील नाश्ता न मिळाल्याने रुग्णाने बाहेरून अग्रवाल हॉटेल वरून नाश्ता आणला आणलेल्या पोह्याच्या नाश्त्यासाठी पोहे आणल्या नंतर मात्र, पोहे खात असताना सोहेल यांना पोह्यांमध्ये पालीचे मुंडके आढळले. या प्रकारानंतर त्यांना मळमळ आणि उलटीचा त्रास सुरू झाला. रुग्णाच्या नातेवाईकांनी तातडीने हा प्रकार वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिला. परंतु, अधिकाऱ्यांनी कोणतीही गंभीर दखल न घेता, ‘तुम्ही बरे व्हाल’ असे सांगून वेळ मारून नेल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली
काही दिवसांपूर्वीच जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी जिल्हा रुग्णालयाला अचानक भेट दिली होती. या भेटीदरम्यान त्यांनी रुग्णालयातील सुविधांमध्ये असलेल्या त्रुटींवरून आरोग्य प्रशासनाला चांगलेच खडसावले होते आणि तातडीने सुधारणा करण्याचे निर्देश दिले होते. मात्र, या घटनेवरून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला आरोग्य प्रशासनाने केराची टोपली दाखवल्याचे स्पष्ट झाले आहे.
खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
रुग्णालय प्रशासनाकडून पुरवल्या जाणाऱ्या जेवण व नाश्त्याची सोय वेळेवर होत नसल्याने अनेक रुग्ण बाहेरून जेवण व नाश्ता मागवतात. सोहेल यांनी पोहेही अग्रवाल नावाच्या एका रेस्टॉरंटमधून आणण्यात आल्याचे समजते. यामुळे बाहेरील उघड्यावरच्या खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. हे पदार्थ अनेकदा आरोग्यासाठी हानिकारक असतात, आणि त्यात असे विषारी जीवाणू किंवा जीवांचे अवशेष आढळल्याने रुग्णांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो.

जिल्हाधिकारी लक्ष घालणार का?
सध्या सुट्टीचा दिवस असल्यामुळे या घटनेची तक्रार अन्न व औषध प्रशासनाकडे त्वरित दाखल करता आलेली नाही. मात्र, या घटनेची गंभीर दखल घेऊन जिल्हाधिकारी अजित कुंभार स्वतः लक्ष घालणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांकडून होत आहे.
सखोल चौकशीची मागणी
या गंभीर घटनेमुळे अकोला शहरातील नागरिकांमध्येही संतापाची लाट उसळली आहे. रुग्णालयासारख्या महत्त्वाच्या ठिकाणी जर अशी निष्काळजी होत असेल, तर सामान्य नागरिकांना न्याय कसा मिळेल, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यामुळे या प्रकरणी तातडीने चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणे गरजेचे आहे. भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.