अकोला न्यूज नेटवर्क
बेंगळुरू : काँग्रेसचे नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी बेंगळुरू येथे निवडणूक आयोगावर (Election Commission) आजवरचा सर्वात तीव्र आणि थेट हल्ला चढवला. निवडणूक प्रक्रियेत भाजप आणि आयोगाने संगनमत करून ‘मतांची चोरी’ केल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. ‘संविधानावर हल्ला कराल, तर खबरदार. संविधानावर हल्ला करण्यापूर्वी दोनदा विचार करा, नाहीतर आम्ही एकेकाला पकडू! वेळ लागेल पण नक्की पकडू,’ असा थेट इशाराही त्यांनी दिला.
‘फ्रिडम पार्क’मधून आरोपांची फैरी
बेंगळुरूमधील ‘फ्रिडम पार्क’ येथे आयोजित एका सभेत राहुल गांधी बोलत होते. त्यांनी असा दावा केला की, ‘काँग्रेसने १०० टक्के पुरावे दिले आहेत की निवडणूक आयोग आणि भाजपने मिळून महाराष्ट्रात एका जागेसाठी १.०२ लाख मते चोरली.’ त्यांनी बिहार, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये निवडणूक आयोगाची वेबसाईट बंद असल्याचा आरोपही केला. विशेषतः बिहारमध्ये मतदार याद्यांच्या ‘स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन’वर मोठा वाद निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले.
शपथपत्राच्या मागणीवर प्रत्युत्तर
निवडणूक आयोगाने ‘तुमच्या आरोपांवर शपथपत्र द्या’ या मागणीवर राहुल गांधी यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. ‘मी खासदार आहे. मी आधीच संविधानाला हातात घेऊन संसदेत शपथ घेतलेली आहे. वेगळं शपथपत्र देण्याची काय गरज आहे?’ असा सवाल त्यांनी उपस्थित केला. निवडणूक आयोगाने जर मतदार यादी आणि निवडणूक व्हिडिओ रेकॉर्डिंग देण्यास नकार दिला, तरी काँग्रेस १० ते १५ जागांवर काम करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्रातील निवडणुकीवर खळबळजनक आरोप
राहुल गांधींनी महाराष्ट्रातील निवडणुकीवरही खळबळजनक आरोप केले. ‘लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीने विजय मिळवला होता, पण फक्त ४ महिन्यांतच भाजपने विधानसभेत विजय मिळवला, हेच पुरेसं आहे की काहीतरी गडबड आहे,’ असे ते म्हणाले. या निवडणुकीत १ कोटी ‘नवीन’ मतदार दिसले, जे लोकसभा निवडणुकीत नव्हते, आणि त्यापैकी बहुतांश मतदार ‘भाजप नेत्यांच्या वन-बेडरूम घरांत’ राहत असल्याचे मतदार यादीत नमूद असल्याचा दावाही त्यांनी केला.

निवडणूक आयोग आणि भाजपचा पलटवार
राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाने प्रतिक्रिया देताना म्हटले की, ‘जर त्यांचे आरोप खरे आहेत, तर त्यांनी ते शपथपत्रात सादर करायला काय हरकत आहे?’ दुसरीकडे, भाजप नेते अमित मालवीय यांनी राहुल गांधींवर टीका केली. ‘त्यांच्याकडे कोणताही मुद्दा नाही. ते केवळ राजकीय नौटंकी करत आहेत, लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करून निवडणूक आयोगाची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करत आहेत,’ असे मालवीय यांनी म्हटले. कर्नाटक भाजपनेही काँग्रेसवर म्हैसूर अर्बन डेव्हलपमेंट घोटाळा, मागासवर्गीयांसाठीच्या निधीचा अपहार आणि बंगळुरूच्या आयपीएल विजय उत्सवातील चेंगराचेंगरीवरून उलटसवाल केले आहेत.