अकोला न्यूज नेटवर्क
अकोला – इन्स्टाग्रामवर ओळख झाल्यानंतर शेअर बाजारात गुंतवणुकीचे आमिष दाखवून तब्बल १३ ते १४ लाख रुपयांची फसवणूक झालेल्या युवकाला अखेर न्याय मिळाला आहे. सायबर पोलिसांच्या सक्रिय तपासामुळे संबंधित बँक खाती गोठवण्यात आली होती. आता न्यायालयाने या फ्रीज खात्यांमधून तक्रारदाराला रक्कम परत देण्याचे आदेश दिले आहेत.
इन्स्टाग्रामवरून सुरू झाली फसवणूक
जून शहरातील फरहान खान अन्वर खान यांची मार्च-एप्रिल २०२४ दरम्यान एका अनोळखी व्यक्तीशी इन्स्टाग्रामवर ओळख झाली. आरोपीने शेअर बाजारात गुंतवणूक करून भरघोस परतावा मिळेल, असे सांगून त्यांच्याकडून १३ ते १४ लाख रुपये वसूल केले.
पैसे दिल्यानंतर संपर्क तोडला
गुंतवणुकीनंतर बराच काळ काहीच न घडल्याने तक्रारदाराने आरोपीकडे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपीने मोबाईल बंद ठेवून संपर्क तोडला. आपली फसवणूक झाली असल्याचे लक्षात येताच तक्रारदाराने सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
सायबर पोलिसांनी तत्काळ कारवाई केली
तक्रारीनंतर पोलिसांनी संबंधित खात्यांवर लक्ष ठेवत त्यातील व्यवहार गोठवले. या खात्यांमध्ये सुमारे १.३० लाख रुपये शिल्लक असल्याचे उघड झाले.
न्यायालयात याचिका, दिलासा मिळाला
तक्रारदाराने न्यायालयात वकिलामार्फत याचिका दाखल केली. सायबर पोलिसांच्या अहवालावर आणि तक्रारदाराच्या बाजूने सादर झालेल्या युक्तिवादावर आधारित निर्णय देताना संयुक्त जेएमएफसी न्यायाधीश गिरहे यांनी फ्रीज खात्यातील रक्कम तक्रारदाराच्या खात्यावर वर्ग करण्याचे आदेश दिले.
वकिलांनी मांडली प्रभावी बाजू
तक्रारदाराच्या वतीने वकील कमल आनंदानी, दर्शना आनंदानी व मयुरी भगत यांनी बाजू प्रभावीपणे मांडत ठोस युक्तिवाद केले. अखेर न्यायालयाने तक्रारदाराच्या बाजूने निकाल देत महत्त्वाचा न्याय दिला.