अकोला न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : दोन दशकांनंतर पुन्हा एकदा जग अणुयुद्धाच्या उंबरठ्यावर उभं असल्याचा गंभीर इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. ‘बुलेटिन ऑफ न्यूक्लिअर सायंटिस्ट्स’ने प्रलयकालीन घड्याळ पुढे ढकलल्याने अणुयुद्ध जवळ आल्याचा स्पष्ट संकेत मिळतो. हे घड्याळ जगात अण्वस्त्रांच्या संभाव्य वापराचं प्रतीक मानलं जातं.
तीन महासत्तांमध्ये अण्वस्त्र शर्यत
अमेरिका, रशिया आणि चीन यांच्यातील तणाव अणुशस्त्रांवरून टोकाला गेल्याचं चित्र दिसतं. रशियानं आंतरराष्ट्रीय अणुकरार झुगारले, चीन नवीन अण्वस्त्रं विकसित करतोय, आणि अमेरिका दोघांना सामोरे जात आहे. या पार्श्वभूमीवर अणुयुद्धाचा धोका अधिकच वाढला आहे, असं अणुतज्ज्ञ रेबेका हेनरिक यांनी सांगितलं.
शांततेसाठी संयम आणि संवाद आवश्यक
हेनरिक यांच्या मते, अण्वस्त्रांची संख्या नाही तर त्यांच्या वापराची तयारी हा खरा धोका आहे. रशियाचं सातत्यानं अणुहल्ल्याची धमकी देणं ही आंतरराष्ट्रीय स्थैर्याला हादरा देणारी बाब आहे. अमेरिका आणि पाश्चिमात्य देशांनी संयम राखत रशियाशी थेट आणि ठाम संवाद साधावा, हीच सध्याच्या संकटावर उपाययोजना ठरू शकते.