अकोला न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : शेतकऱ्यांबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या वक्तव्यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज तीव्र शब्दांत टीका केली. “शेतकऱ्यांच्या वाटेत खिळं ठोकणाऱ्या, दिल्लीत भिंती उभ्या करणाऱ्या मोदींना आता अचानक त्यांचं दु:ख का आठवलं?”, असा सवाल ठाकरे यांनी उपस्थित केला. याशिवाय डोनाल्ड ट्रम्प यांच्या ट्रम्प टॅरिफबाबत मोदी सरकारच्या मौनावरही त्यांनी टीका केली आणि सरकारच्या परराष्ट्र धोरणावर गंभीर शंका उपस्थित केल्या.
शेतकऱ्यांबाबतची सहानुभूती उशिरा का?
पंतप्रधान मोदींनी शेतकऱ्यांच्या हितासाठी ‘मोठी किंमत मोजायला तयार आहे’ असं वक्तव्य केलं. यावर प्रत्युत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले, “शेतकऱ्यांच्या मार्गात अडथळे निर्माण करणाऱ्या सरकारला आता अचानक शेतकऱ्यांची आठवण का झाली? यांचा खरा चेहरा रोज उघड होत आहे.” दिल्लीत शेतकरी आंदोलनादरम्यान उभ्या केलेल्या भिंती आणि टाकलेल्या खिळ्यांची आठवण करून देत त्यांनी भाजप सरकारवर निशाणा साधला.
देशाला नेतृत्व हवं, भ्रम नाही
ठाकरे म्हणाले, “देशाला खऱ्या अर्थाने नेतृत्व हवं आहे – पंतप्रधान, गृहमंत्री, संरक्षण मंत्री. पण सध्या सरकार केवळ भ्रम निर्माण करतं आहे. ऑपरेशन सिंदूर घडलं तरी मोदी बिहारमध्ये प्रचारासाठी गेले. परराष्ट्र धोरण पूर्णपणे अपयशी ठरत आहे.” डोवाल रशियात, मोदी चीनकडे – हे सर्व कोणासाठी?, असा थेट सवालही त्यांनी उपस्थित केला.
एनआरसीबाबत निवडणूक आयोगाने स्पष्ट भूमिका घ्यावी
बिहारमध्ये मतदार यादीतील गोंधळाबद्दल बोलताना ठाकरे म्हणाले, “जेव्हा मतदारालाच आपली ओळख पटवावी लागते, तेव्हा ही प्रक्रिया अघोषित एनआरसीसारखी वाटते. देशात एनआरसी लागू झालंय का? निवडणूक आयोगाने यावर स्पष्ट उत्तर द्यावं.”
ट्रम्प टॅरिफचा फटका, सरकार गप्प का?
अमेरिकेने भारतातील वस्तूंवर 25 टक्के टॅरिफ लादले असून, हा फटका भारतीय व्यापाऱ्यांना बसणार आहे. यावरून ठाकरे म्हणाले, “ट्रम्प आपल्या देशाची खिल्ली उडवत आहेत, पण सरकार गप्प आहे. मोदींनी अमेरिकेला एकही शब्द का नाही बोलला? नेमकं देशाचं सरकार चालवतंय कोण?”
मोदींचं वक्तव्य – मी किंमत मोजायला तयार
दुसरीकडे, पंतप्रधान मोदींनी स्वामीनाथन शताब्दी परिषदेत स्पष्ट केलं की, भारत आपल्या शेतकरी, पशुपालक व मच्छीमार बांधवांच्या हिताला प्राधान्य देतो. “मला मोठी किंमत मोजावी लागेल, पण मी तयार आहे,” असं त्यांनी सांगितलं. अमेरिकेच्या दबावाखालीही भारत कृषी व दुग्ध क्षेत्रात तडजोड करणार नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.
7 ऑगस्टपासून भारतातून अमेरिकेत विक्री होणाऱ्या वस्तूंवर 25 टक्के आयातशुल्क लागू होणार असून, 27 ऑगस्टपासून अतिरिक्त सूटही लागू होईल. यामुळे भारतीय वस्तू महाग होऊन त्यांची मागणी घटू शकते.