अकोला न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : नांदणी मठातील महादेवी ऊर्फ माधुरी हत्तीण गुजरातमधून परत आणण्यासाठी जनभावना तीव्र झाली आहे. याच पार्श्वभूमीवर ‘वनतारा’कडून अधिकृत निवेदन जारी करून महादेवीच्या पुनर्वसनासाठी कोल्हापूरजवळच विशेष केंद्र उभारण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. “आपल्यामुळे कोणी दुखावलं गेलं असेल, तर मिच्छामी दुक्कडम – आम्ही क्षमायाचना करतो,” असा भावनिक सूरही वनताराने आपल्या निवेदनातून व्यक्त केला.
कोल्हापूरातच होणार महादेवीचं पुनर्वसन?
वनताराने म्हटलं आहे की, नांदणी मठ आणि कोल्हापूरकरांची धार्मिक भावना आम्हाला मान्य आहे. या भावनेचा सन्मान ठेवत कोल्हापुरातील नांदणी परिसरातच माधुरीसाठी उच्चस्तरीय पुनर्वसन केंद्र उभारण्याची तयारी त्यांनी दाखवली आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांची पूर्ण अंमलबजावणी
माधुरीच्या स्थलांतराचा निर्णय केवळ न्यायालयाचा असून, वनताराची भूमिका फक्त तिला वैद्यकीय सहाय्य देण्यापुरती मर्यादित होती. कोणत्याही धार्मिक परंपरेत हस्तक्षेप करण्याचा हेतू कधीही नव्हता, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
पुनर्वसन केंद्रात असणार खास सुविधा
हत्तींसाठी हायड्रोथेरपी तलाव, लेसर थेरपी, मोकळा हिरवागार परिसर, वाळूने भरलेला हौद, रबरायझ्ड फर्श, सतत वैद्यकीय सेवा आणि साखळ्याशिवाय वावरण्याची मोकळीक अशी विविध आधुनिक सुविधा प्रस्तावित करण्यात आल्या आहेत.
कोणतंही श्रेय नको, फक्त न्याय हवा
वनताराने स्पष्ट केलं आहे की, हा प्रस्ताव केवळ न्यायालयाच्या मार्गदर्शनासाठी असून त्यात कोणताही व्यक्तिगत लाभ, श्रेय किंवा दबाव नाही. मठ, राज्य सरकार आणि न्यायालयाच्या निर्देशानुसारच पुढील निर्णय घेतले जातील.
“आपल्यामुळे कोणी दुखावलं, तर क्षमायाचना”
निवेदनाच्या शेवटी वनताराने म्हटलं आहे, “आपण सर्वजण माधुरीवरील प्रेमातून एकत्र आलो आहोत. आमच्या कृतीने जैन समाज किंवा कोल्हापूरकर दुखावले असतील, तर आम्ही मनापासून ‘मिच्छामी दुक्कडम’ म्हणतो.”