अकोला न्यूज नेटवर्क
मुंबई : दादर कबुतरखान्यावरील अतिक्रमणावरून आज जैन समाज आक्रमक झाला. आंदोलनकर्त्यांनी ताडपत्री फाडून थेट कबुतरखान्यात प्रवेश केला. या पार्श्वभूमीवर मनसे नेते अविनाश जाधव यांनी थेट जैन समाजाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत माधुरी हत्तीच्या प्रकरणावरून संतप्त प्रतिक्रिया दिली.
“हत्तीणीसाठी आम्ही देखील तेच करावं का?”
“ज्या पद्धतीने कबुतरखान्यासाठी आंदोलन केलं जातंय, त्या पद्धतीने आम्ही माधुरी हत्तीला आणण्यासाठी वनतारावर मोर्चा काढायचा का?” असा थेट सवाल जाधव यांनी केला. त्यांनी म्हटले की, हे दोन्ही विषय सुप्रीम कोर्टाच्या आदेशाशी संबंधित असून, जर एकासाठी अशा प्रकारे राडा केला जात असेल तर दुसऱ्यासाठीही न्याय हवा.
“राज ठाकरेंनी आता उघड भूमिका घ्यावी”
अविनाश जाधव यांनी यावेळी खुलासा केला की, त्यांना अनेक फोन, मेसेज येत आहेत की राज ठाकरे यांनी माधुरी हत्तीबाबत भूमिका घ्यावी. या पार्श्वभूमीवर त्यांनी सांगितले की, सुप्रीम कोर्टाशी सुसंगत भूमिका घेऊन सरकारने पुढाकार घ्यावा.
“जैन समाजाकडून ही अपेक्षा नव्हती”
कबुतरखान्यावर झालेल्या हिंसक आंदोलनावर जाधव म्हणाले की, “जैन समाज शांतताप्रिय असून अशा प्रकारच्या आंदोलनाची अपेक्षा नव्हती. जर त्यांच्या मागणीला सहानुभूती मिळते, तर माधुरी हत्तीप्रकरणालाही तितकीच समजूतदार भूमिका दिली पाहिजे.”
“धार्मिकता शहरे नव्हे, मोकळ्या जागांमध्ये निभवा”
कबुतरांमुळे आरोग्यावर होणाऱ्या परिणामांची दखल घेत जाधव म्हणाले की, “दम्याचा त्रास वाढतो हे अनेक डॉक्टर सांगतात. अशा वेळी शहराच्या बाहेर मोठ्या मोकळ्या जागांवर कबुतरखाने उभे करावेत.”