अकोला न्यूज नेटवर्क
मुंबई : आगामी मुंबई महापालिका निवडणुकांमध्ये वापरल्या जाणाऱ्या EVM मशीनविषयी खळबळजनक आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. मध्य प्रदेशातील EVM घोटाळ्यात वापरलेलीच यंत्रं महाराष्ट्रात आणून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेतल्या जात आहेत, असा थेट आरोप त्यांनी केला.
EVM, पण VVPAT नाही!
राऊत म्हणाले की, “मुंबई महापालिका निवडणुकीत EVM वापरणार पण व्हीव्हीपॅट मशीन नसेल. म्हणजे कोणाला मत दिलं ते मतदाराला कळणारच नाही. मग निवडणूक घेण्याचा हेतूच काय?” ते पुढे म्हणाले की, “EVM घोटाळा झाला तोच मशीन महाराष्ट्रात आणलं जातंय. हे लोकशाहीवर थेट आघात आहे.”
“निवडणूक आयोग त्यांचा गुलाम”
संजय राऊतांनी निवडणूक आयोगावरही जोरदार टीका केली. “हा आयोग स्वतंत्र राहिलेला नाही. तो सत्ताधाऱ्यांचा गुलाम बनला आहे. मतमोजणीला उशीर होतो, म्हणून VVPAT टाळणं म्हणजे निवडणुकीच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह आहे,” असंही ते म्हणाले.
“दिल्लीच्या गवतावर विजार पांढरी ठेवून वाट पाहावी लागते”
राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांच्या दिल्ली भेटींबाबत बोलताना, “शिंदेसेनेचे प्रमुख दिल्लीत आले असतील, तर त्याचा उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याशी संबंध लावू नये. भाजपमध्ये निर्णय दिल्लीत घेतले जातात. तिथे वाट बघावी लागते, गवतावर बसावं लागतं, विजार पांढरी असेल तर लॉन्च गवत लावून परतावं लागतं. हा दिल्लीचा इतिहास आहे,” असं राऊत म्हणाले.
“सरकारमध्ये मोठी माणसं नाहीत”
एकनाथ शिंदे यांच्या सलग दुसऱ्या दिल्ली दौऱ्याबाबत विचारल्यावर राऊत म्हणाले की, “महाराष्ट्राच्या राजकारणात मोठं घडेल अशी शक्यता नाही. कारण सरकारमध्ये मोठी माणसंच नाहीत. भाजपमुळे ही महान परंपरा खंडित झाली आहे.”
“खेल महाराष्ट्रात नाही, दिल्लीत होणार”
राहुल गांधींच्या “बडा खेला होनेवाला है” या विधानावर प्रतिक्रिया देताना राऊत म्हणाले की, “तो खेल महाराष्ट्रात नव्हे, दिल्लीत होणार आहे. कारण महाराष्ट्रात खेळ घडवण्यासाठी पात्रता असलेली माणसं सरकारात नाहीत.”