WhatsApp

महादेवी हत्तीणीचं पुनरागमन? वनताराचा मोठा निर्णय, कोल्हापुरात पुनर्वसनाची तयारी

Share

अकोला न्यूज नेटवर्क
मुंबई : सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर गुजरातच्या वनतारा प्रकल्पात हलविण्यात आलेली कोल्हापूरच्या नांदणी मठातील हत्तीण ‘महादेवी’ पुन्हा कोल्हापूरमध्ये परतेल, अशी शक्यता आता निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वनतारा व्यवस्थापन यांच्यात झालेल्या बैठकीनंतर मोठी घोषणा करण्यात आली. राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात हत्तीणीच्या परतीसाठी स्वतंत्र याचिका दाखल करणार असून, या याचिकेत वनतारा देखील सहभागी होणार आहे.



महादेवीला परत आणण्याचा मार्ग मोकळा?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं की, वनतारा व्यवस्थापनाने महादेवीला परत पाठवण्यासाठी राज्य सरकारच्या याचिकेला पाठिंबा देण्याचं आश्वासन दिलं आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, “महादेवीच्या ताब्यासाठी आमचा कुठलाही हेतू नव्हता, आम्ही केवळ सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले.”

पुनर्वसन केंद्रासाठी वनताराची मदत
राज्य शासनाने नांदणी मठाजवळच निवडलेल्या जागेवर महादेवीसाठी हत्ती पुनर्वसन केंद्र उभारण्याचा निर्णय घेतला असून, वनताराने त्यासाठी सर्वतोपरी मदतीची तयारी दर्शवली आहे. ही व्यवस्था सर्वोच्च न्यायालयाच्या निकषांनुसार उभारली जाईल, अशी माहिती बैठकीत देण्यात आली.

सरकारचा न्यायालयीन पाठपुरावा
या संपूर्ण प्रकरणी राज्य सरकार आणि नांदणी मठ सर्वोच्च न्यायालयात स्वतंत्र पुनर्विचार याचिका दाखल करणार आहेत. हत्तीणीच्या आरोग्य, निगा, आणि राहण्याच्या व्यवस्थेसाठी डॉक्टरांची नियुक्ती, आवश्यक ते उपचार व विशेष सुविधा देण्याचे प्रस्तावही याचिकेमध्ये मांडले जाणार आहेत.

जनभावनांचा आदर आणि धार्मिक श्रद्धेचा सन्मान
कोल्हापूरमधील जनतेच्या भावना लक्षात घेत राज्य शासनाने त्वरीत बैठक घेतली. हत्तीणीला परत आणण्याची प्रक्रिया केवळ कायदेशीरच नव्हे तर भावनिकदृष्ट्याही महत्त्वाची असल्याचे मुख्यमंत्री फडणवीसांनी अधोरेखित केले.

Leave a Comment

error: Content is protected !!