अकोला न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाने शहरातील सर्व कबुतरखाने बंद करण्याचे आदेश दिल्यानंतर मुंबई महानगर पालिकेकडून अंमलबजावणी सुरू झाली. मात्र, या आदेशाचा तीव्र विरोध करत जैन समाजाने पुन्हा आक्रमक पवित्रा घेतला असून, आज दादर येथील कबुतरखान्यावर मोठा गोंधळ पाहायला मिळाला. आंदोलकांनी ताडपत्री फाडत कबुतरखान्यात प्रवेश केला आणि पोलिसांशी हुज्जत घालत कबुतरांसाठी खाद्य टाकण्याचा प्रयत्न केला.
आंदोलकांचा संताप; ताडपत्री फाडत आत शिरले
दादर कबुतरखान्याजवळ आज सकाळी जैन समाजाचे आंदोलक मोठ्या संख्येने जमले. त्यांनी तिथे टाकलेली ताडपत्री फाडून आत प्रवेश केला. आंदोलकांनी कबुतरांच्या अन्नासाठी आणलेलं धान्य जमिनीवर टाकत निषेध व्यक्त केला.
पोलिसांशी झटापट, तोडफोडचा प्रकार
पोलिसांनी आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, आंदोलकांनी झाकण्यासाठी केलेले बांबूंचे बांधकाम तोडण्याचा प्रयत्न करत पोलिसांच्या सूचनांकडे दुर्लक्ष केले. यामुळे वातावरण तणावपूर्ण झाले.
आंदोलन स्थगित नव्हतेच, दावा आंदोलकांचा
मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर आंदोलन स्थगित झाल्याच्या चर्चांवर आंदोलकांनी नाराजी व्यक्त केली. “आम्ही आंदोलन थांबवलेले नाही, सरकारला तोडगा काढायला वेळ दिला होता,” असा खुलासा आंदोलकांनी माध्यमांसमोर केला. तसेच, न्यायालयीन सुनावणी होईपर्यंत कबुतरांची अन्नव्यवस्था कशी केली जाणार? असा सवालही उपस्थित केला.
सरकारची भूमिका आणि पावलं
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आंदोलनाची माहिती देताना सांगितले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली होती. संजय गांधी उद्यान किंवा इतर मोकळ्या जागांमध्ये कबुतरांसाठी खाद्यव्यवस्थेचा विचार सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मुंबई महानगरपालिका आयुक्तांनाही यासाठी सूचना करण्यात आल्याचे ते म्हणाले.