अकोला न्यूज नेटवर्क
भंडारा : भंडारा जिल्ह्यातील राजापूर गावातील जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळेची इमारत सध्या मृत्यूच्या छायेखाली उभी आहे. १९९० मध्ये बांधलेली ही इमारत आज इतकी धोकादायक झाली आहे की, कधीही कोसळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आणि त्यात दररोज १२७ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. इमारतीची अवस्था दयनीय असून, छताच्या भेगा, भिंतींवरील पडझड आणि कमकुवत झालेली रचना पाहता एक अपघात टळणं हे फक्त नशिबावर आहे.
प्रशासनाचा थंड प्रतिसाद आणि ग्रामस्थांचा संताप
ग्रामपंचायतचे कार्यालय शेजारीच असूनही या धोकादायक इमारतीकडे कोणतेही लक्ष दिलं गेले नाही, ही गोष्ट ग्रामस्थांच्या संतापाचे मुख्य कारण ठरली आहे. माजी उपसरपंच वसंत बिटले यांनी १५ ऑगस्टपर्यंत इमारत न पाडल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
मुख्याध्यापकांची कबुली
मुख्याध्यापक हेमंत थावरे यांनी स्पष्ट सांगितले की, इमारत जीर्ण असल्याचा अहवाल ग्रामपंचायतीकडे आधीच सादर केला आहे. पण त्यावर कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे आणि शिक्षकांचे जीव सध्या धोक्यात आहेत.
शिक्षणमंत्र्यांचा हस्तक्षेप आणि कारवाईचे आदेश
आज भंडाऱ्यात आलेल्या शिक्षण मंत्री दादा भुसे यांना सामाजिक कार्यकर्ते विजय क्षीरसागर यांनी ही बाब मांडली. शिक्षणमंत्र्यांनी याची तात्काळ गंभीर दखल घेत जिल्हाधिकारी डॉ. संजय कोलते यांना त्वरित कारवाईचे आदेश दिले आहेत.
संपूर्ण व्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह
ही केवळ एका गावातील शाळेची नाही, तर राज्यातील शिक्षण व्यवस्था, निधी वितरण आणि प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर मोठं प्रश्नचिन्ह उभं करणारी घटना आहे. विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या या स्थितीमुळे संपूर्ण समाज अस्वस्थ आहे.