अकोला न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्हा स्त्री रुग्णालयात पुन्हा एकदा आरोग्य यंत्रणेतील ढिसाळ कारभार समोर आला आहे. २४ वर्षीय श्वेता पडघान या तरुण महिलेचा प्रसूतीदरम्यान संशयास्पद मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. यापूर्वीच नवजात बालकाच्या मृत्यूनंतर तीन कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई झालेली असताना, ही दुसरी गंभीर घटना घडल्याने आरोग्य विभागाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
प्रसूतीच्या दिवशीच घडला दुर्दैवी मृत्यू
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी ११ वाजता श्वेता पडघान यांच्यावर सिझेरियन शस्त्रक्रिया करण्यात आली. काही तासांतच तिच्या पोटात तीव्र वेदना सुरू झाल्या. दुपारी साडेतीनच्या सुमारास पुन्हा शस्त्रक्रिया करत गर्भपिशवी काढण्यात आली. मात्र, प्रकृतीत कोणतीही सुधारणा न झाल्याने रात्री साडेआठच्या सुमारास तिला जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले, जिथे रात्री ९ वाजता तिचा मृत्यू झाला.
नातेवाईकांचा संताप अनावर
डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे श्वेताचा मृत्यू झाला, असा थेट आरोप नातेवाईकांनी केला आहे. त्यांनी मृतदेह ताब्यात घेण्यास स्पष्ट नकार दिला असून, जबाबदारांवर कठोर कारवाई होईपर्यंत आंदोलनाच्या इशाऱ्यावर ठाम आहेत. त्यांचा आरोप आहे की, वेळेवर योग्य उपचार आणि लक्ष दिले गेले असते तर श्वेताचा जीव वाचला असता.
आरोग्य यंत्रणेवरील विश्वास ढासळतोय?
या घटनेने जिल्हावासीयांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, रुग्णालय प्रशासनाच्या विरोधात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. अलिकडच्या काही दिवसांत आरोग्य विभागातील घटनांनी नागरिकांच्या मनात भीतीचे आणि अविश्वासाचे वातावरण निर्माण केले आहे. शासकीय रुग्णालये ही गरिबांसाठी शेवटचा आधार मानली जातात, मात्र या आधाराचाच खंबीरपणा डळमळीत झाल्याचे चित्र आहे.
प्रशासनाची भूमिका काय?
या प्रकरणी दोषी कोण, चुकी कुणाची, याचा छडा घेण्यासाठी आरोग्य प्रशासनाला तातडीने पावले उचलावी लागणार आहेत. अन्यथा नागरिकांचा उद्रेक अटळ ठरू शकतो. पडघान कुटुंबीयांना न्याय मिळतो का, आणि रुग्णालयातील कार्यपद्धतीत काही बदल घडतात का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.