अकोला न्यूज नेटवर्क
उत्तरकाशी (उत्तराखंड) : उत्तरकाशी जिल्ह्यात मंगळवारी सायंकाळी झालेल्या ढगफुटीमुळे (Cloudburst) परिसरात भीषण पूर आला असून, आतापर्यंत चार नागरिकांचा मृत्यू झाल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले आहे. अनेकजण बेपत्ता असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
ढगफुटीनंतर आलेल्या अचानक पुरामुळे धराली परिसरातील घरे, झोपड्या आणि रस्ते वाहून गेले. पाण्याचा जोर एवढा प्रचंड होता की, काही लोकांना जीव वाचवण्यासाठी धडपड करताना आणि पाण्यात वाहून जाताना पाहिलं गेलं.
धडपडणारे नागरिक, वाहून जाणारी घरं – सोशल मीडियावर धक्कादायक दृश्यं
पूरग्रस्त भागातील काही व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. एका व्हिडीओत पाण्याच्या लोटांपासून जीव वाचवण्यासाठी ओरडत पळणारे नागरिक आणि वाहून जाणाऱ्या इमारतींचे हृदयद्रावक दृश्य कैद झाले आहे.
चार मृत, अनेक बेपत्ता – प्रशासन सज्ज
जिल्हाधिकारी प्रशांत आर्य यांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेत किमान चार मृत्यू झाले असून, मदत आणि बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. एनडीआरएफची चार पथके आणि आयटीबीपीच्या तीन टीम्स घटनास्थळी पोहोचल्या आहेत.
पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांची तातडीची दखल
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी परिस्थितीची गंभीर दखल घेतली असून, मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्याशी संवाद साधला आहे. बचावकार्य वेगाने सुरू असून, लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यासाठी सर्व प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.
स्थानिक प्रशासन सतर्क
राज्य आपत्ती निवारण यंत्रणा, पोलीस आणि स्थानिक स्वयंसेवक मिळून मदतीचे काम करत आहेत. काही भागांमध्ये मोबाईल नेटवर्क ठप्प असून, संपर्क साधण्यात अडथळे येत आहेत.